मुख्यमंत्री देवेंद्र अहिल्यानगर फडणवीस यांना शहरातून निवेदन
नगर – अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्तीच्या रजेवर पाठविलेले आरोग्य अधिकारी आणि लेखा व्यवस्थापक यांच्या संगनमताने ३२ लाख रुपये अपहार झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात लक्ष घातले तर असे निदर्शनास येते की कंत्राटी कामगार हा तात्पुरत्या वेतन श्रेणीवर नेमणूक करण्यात येते. कंत्राटी व्यक्तीला अधिकार किती असावा हे पाहणे गरजेचे आहे. हे न पाहता कंत्राटी पद्धतीने भरती केलेले विजय रणदिवे यांना आरोग्य विभागात लेखा व्यवस्थापक असे मुख्यपद देणे तसेच अनेक आर्थिक व्यवहार बाबत अधिकार देणे हे योग्य नाही. त्यामुळे कंत्राटी कामगाराला अधिकारी देणाऱ्या सर्व अधिकारी, आयुक्त, आस्थापना प्रमुख यांची चौकशी होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेत पाहिले तर अनेक कंत्राटी कामगार आहेत. त्यांना विविध विभागात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नागरिकांची लूट होत आहे. त्याकरिता या कंत्राटी कामगारांना अभय कोण देते हे पाहणे गरजेचे आहे. अश्या अनेक कंत्राटी कामगारांना अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिले गेले, सह्यांची परवानगी दिली गेली, अधिकार तपासताना लेखा परीक्षक सुध्दा झोपेत दिसत आहे. त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून नियमबाह्य पद्धतीने अहिल्यानगर महानगरपालिकेचे ऑडिट होते अशी शंका निर्माण होते, असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे. त्या करिता कंत्राटी भरतीच्या लोकांना पदसिद्ध अधिकारी म्हणून कोणत्याही विभागात नियुक्ती करू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन हे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नाशिक यांना मेल द्वारे पाठविण्यात आले असल्याचे भुतारे यांनी सांगितले.