श्री राधाकृष्णजी महाराज यांचे प्रतिपादन
नगर – भगवान श्रीकृष्ण हेच पती आहेत. त्यांच्याशिवाय अन्य कोणाचा विचारही न करणाऱ्या संत मिराबाईंचे जीवन चरित्र भारतीय महिलांसह युवतींना प्रेरणादायीच आहे, असे श्री राधाकृष्णजी महाराज यांनी सांगितले.
येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट व्दारा शहरात प्रथमच आयोजित केलेल्या संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफताना नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते.
मीराबाईंच्या जन्मापासूनचे प्रसंग बारकाईने निरूपण करताना श्री राधाकृष्णजी महाराज म्हणाले, बालपणी आईने गिरीधर गोपाल तुझे पती आहेत असे मिराबाईला सांगितले. तेव्हापासून मीराबाई श्रीकृष्णाला पती मानत पतीच्या सानिध्याचा, सेवेचा आनंद घेऊ लागली. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई हा मीराबाईंचा भावच पुढे दृढ संकल्प होऊन श्रीकृष्ण रूपात मीराबाईला विलीन होण्यास कारणीभूत ठरला. मीराबाईचा विवाह मेवाडचे राजकुमार भोजराज यांच्याशी ठरवला गेला तेव्हाही मीराबाईने माझा विवाह श्रीकृष्णाशी झालेला आहे, असे राजकुमारला स्पष्टपणे सांगते. मी तुझ्या श्रीकृष्ण भक्तीच्या आड येणार नाही असे
भोजराजने सांगितल्यावर लौकीकार्थाने मीराबाईचा विवाह झाला पण भोजराजशी मीराबाई श्रीकृष्णभक्तीत इतकी तल्लीन राहिली की भगवान श्रीकृष्णाला तिला आपल्या हृदयात स्थान द्यावे लागले. आईने सांगितलेल्या पतीशी एकनिष्ठ कसे रहावे? हे मीराबाईंचे चरित्र सांगते. मानवी संबंधासारखे भगवंताशी नाते निर्माण केले तर भगवंताला भक्तास जवळ घ्यावेच लागते.
विवाहासाठी मुलगी पहाताना तिचा सेवाभाव आणि मुलगा पहाताना त्याचा आदरभाव पहावा. विवाह संबंधात धनास प्राधान्य देवू नये. आपल्या घरासाठी कोणती मुलगी योग्य आहे हे महिला नेमकेपणाने सांगू शकतात. प्रत्येक मुलगी मातृत्व भाव घेऊनच जन्म घेते. स्त्रीने डोक्यावर पदर ठेवावा तो कधीही डोक्यावरून पडू देऊ नये या भारतीय परंपरेमागे मोठे शास्त्र आहे. पदर घेणे हे सौभाग्याचे प्रतिक आहे. किमान पूजा-पाठ करताना, मोठ्यांना नमस्कार करताना डोक्यावर पदर घेतला तरच विशेष आशीर्वाद मिळतो.
पतीची कमाई कमी वाटणाऱ्या महिला काम करतात. मला करिअर करायचे. कॅफेबल व्हायचे असे म्हणत नोकरी स्विकारून आई होण्याच्या सुखापासून दूर रहाण्यात आनंद मानतात. आई झाल्याच तर मुलासाठी वेळ देत नाहीत. मुलं सांभाळण्यास बाई ठेवतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलास स्वतः सांभाळत होती. दार्सीकडे मुलाला सोपवत नव्हती. मुलं स्वतः सांभाळण्यातील सुखाचा आनंद आईने घ्यावा. मुलांसाठी प्राधान्याने वेळ द्यावा. शिक्षकांना मुलांकडे ध्यान द्या असे न सांगता आपण मुलांच्या अभ्यासाकडे त्याच्यावर सुसंस्कार करण्याकडे लक्ष द्यावे. बाळाला अंगावरचे दूध पाजताना प्रसन्नपणे पाजले तरच बाळही प्रसन्न रहाते. असे बाळ जीवनभर सर्वांना प्रसन्नता देते. आईच दूध पाजताना रागावलेली, दुःखी असेल तर बाळात आईचा भाव उतरेल. असे बाळ जीवनभर इतरांची मने दुखावत दुःख देत राहिल. बाळाचे उत्तम संगोपन करणे ही आईची एक प्रकारची तपस्याच आहे. बाळाला जन्म देऊन पाळणाधरात किंवा लोकांना सांगण्यासाठी महागड्या होस्टेलला ठेवणे हा आईचा धर्म नाही, असे राधाकृष्णजी महाराजांनी ठणकावून सांगितले.
विमानातील एअर होस्टेस स्वतःचे दुःख बाजूला ठेवून जशी सदैव प्रसन्न रहाते तसे तसे सूनबाईने सदैव प्रसन्न राहिले पाहिजे. आपण समाजाला देशाला आजपर्यंतच्या जीवनात काय दिले? याचे चिंतन जन्मदिनी करावे. मेणबत्या विझवत, केक कापत, सिनेमाची गाणी म्हणत, रात्रीच्या अंधारात जन्मदिन साजरे करू नये. घरातल्यांकडून औक्षण करून घेत मोठ्यांचे आणि मंदिरातील देवांचे आशीर्वाद घेत गोशाळांना चारा व अनाथांना मिष्टान्न भोजन देवून जन्मदिन भारतीय परंपरेप्रमाणे दिवसा साजरा करावा. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत आपले चारित्र्य जपले पाहिजे. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत आपले जीवन खराब करून घेऊ नका, असे आवाहन करताना राधाकृष्णजी महाराजांनी हलकेच चिमटे घेत दिलेले दाखले उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले.
शहरासह उपनगरवासियांनी उपस्थित राहून संत मिराबाई चरित्र कथा सोहळ्याचा आनंद लुटला. मिराबाईंचे चरित्र आजच्या काळातही मार्गदर्शन करते अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटल्या.





