शाळकरी मुले व नागरिकांवर हल्ले करणारे माकड अखेर जेरबंद

0
79

वनविभागाच्या टीमने  राबविले रेस्क्यू ऑपरेशन, माकडाला सुरक्षित अधिवासात सोडले

नगर – गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावात नागरिक तसेच शाळकरी मुलांवर हल्ला करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या पथकाला यश आले. या माकडाला सुरक्षित अधिवासात सोडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी १० फेब्रुवारीला सकाळी हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.

पिंपळगाव वाघा गावात गेल्या काही दिवसांपासून एक माकड धुमाकूळ घालत होते. सदर माकड जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातच वावरत होते. त्यामुळे अनेक शाळकरी मुलांवर तसेच परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांवर त्याने हल्ले केले होते. माकडाच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने त्याला जेरबंद करण्याची आग्रही मागणी नागरिकांनी केली होती. गावच्या सरपंचांनी देखील २ दिवसांपूर्वी वन विभागाला पत्र देवून या हल्ले खोर माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.

त्यामुळे १० फेब्रुवारीला सकाळीच वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक गाडेकर, चालक संदीप ठोंबरे, वन कर्मचारी सखाराम येणारे, तेजस झिने, सुभाष हंडोरे, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया, सचिन क्षीरसागर यांच्या पथकाने गावात दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. बराच वेळ त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात रेस्क्यू टिमला यश आले. या पथकाने माकडाला पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित अधिवासात सोडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.