वाढलेल्या गुन्हेगारीमुळे शहरासह उपनगर परिसराचा बिहार झाला; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपार करा रात्रीची गस्त वाढवा; टोळ्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन
नगर शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बोल्हेगाव-नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला असून या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी तातडीने मोडून काढावी अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पत्रकार परिषदेमध्ये पुढे म्हटले आहे की, बोल्हेगाव-नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारीबाबत संताप व्यक्त करत पोलिसांच्या अर्थपूर्ण निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीकास्त्र केले. बोल्हेगावनागापूर एमआयडीसी भागात सध्या चौका-चौकात गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या हप्ते वसुली, महिला मुलींची छेडखानी, बिंगो मटक्याचे अड्डे चालवित असून या भागातील महिला, तरुणी, सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, व्यापारी कुणीही सुरक्षित राहिला नाही. सर्वसामान्य माणसांना दादागिरी केली असून जीवघेणे हल्ले करून खुनाचे प्रयत्न होत आहे तर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे पाप एमआयडीसी व तोफखाना पोलीस करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या भागातील ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशांना तातडीने तडीपार करावे व एमआयडीसी खंडणीमुक्त व हप्तेवसुलीमुक्त करावी. बोल्हेगाव-नागापूर परिसरात रात्रीची गस्त वाढून चौकाचौकात बसणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा या भागातील रहिवासी भागात सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी दत्ता पाटील सप्रे यांनी केली आहे. या भागात रात्री-अपरात्री मोटरसायकलवर टोळके फिरते. चौकामध्ये टवाळक्या करत असून महिला, मुलींची छेडखानी होते यासाठी पोलिसांनी विशेष गस्त सुरू करून या टोळक्यांना आवर घालण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील नागापूर, बोल्हेगाव फाटा, बोल्हेगाव पुल, लोकवस्तीतील अंतर्गत चौक अशा परिसरातील चौकांमध्ये रात्री ११ नंतर तरुणांची टोळकी बसून राहतात व हे रस्त्यावर का थांबतात अशी विचारणा करण्यासाठी पोलीस पथक या भागात येत नाही त्यातूनच गुन्हेगारी वाढली आहे. या टोळक्यांना काहींचा राजकीय वरदहस्त असल्याने त्यांची मुजोरीही वाढली आहे. गेल्या काही वर्षापासून नगर शहराचा विस्तार होत आहे. बोल्हेगाव, एमआयडीसी, नागापूर, तपोवन रोड आदी महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे परंतु या लोकवस्तीला आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून धोका निर्माण झाला आहे. या भागातील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ झाली आहे. सद्यस्थितीत नगर शहरात कार्यरत असलेल्या कोतवाली व तोफखाना या दोन पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतच हा सर्व भाग येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने व वाढती गुन्हेगारी लोकसंख्या रहदारी आदी बाबी लक्षात घेता बोल्हेगाव, सावेडी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे देण्यात यावे. तोफखाना, सावेडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी द्यावे अशी मागणी दत्ता पाटील सप्रे यांनी केली असून, या भागातील गुन्हेगारांकडून चोरी, घरफोडी यांच्यासह घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, कामगारांकडून हप्ते वसुली करणे, अवैध सावकारकी व वेश्याव्यवसाय असे गंभीर गुन्हे केले जात आहेत. सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आणली आहे त्यामुळे या गुन्हेगारी विरोधात कोणीही पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची हिंमत करत नाही. मागील काही दिवसांतील घटना पाहता चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न, एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणे, अवैध सावकारी किंवा त्या अंतर्गत कामगारांना वेठीस धरणे आदी प्रकार उघडकीस आले आहे. या सर्व गुन्हेगारी कृत्याकडे एक जबाबदार लोकप्रतिनिधी व नागरिक म्हणून शांतपणे पाहणे शक्य नाही. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने या भागातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे. चौकाचौकात बिंगोचे व मटक्याचे अड्डे सुरू असून, त्यांना कोणत्या पोलिसांचा आशीर्वाद आहे? असा सवालही दत्ता पाटील सप्रे यांनी केला. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी भागातील गुन्हेगारी सक्तीने मोडून काढावी व या भागाचा विहार होण्यापासून वाचवावे अन्यथा आम्हाला नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही दत्ता पाटील सप्रे यांनी घेतलेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितले