श्री राधाकृष्णजी महाराज यांचे प्रतिपादन
नगर – अलिकडच्या काळात सर्व सुख मिळवण्याचा कल वाढत चालला असताना घरा-घरातील सहनशक्तीच संपू लागली आहे. कुटुंब व्यवस्था अबाधित रहाण्यासाठी सासरी जाणाऱ्या मुलीला आईने सहन करण्याचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन श्री राधाकृष्णजी महाराज यांनी केले.
येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट व्दारा अहिल्यानगरमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफताना नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते. सनई चौघड्याच्या निनादात महाराजांचे कथास्थळी आगमन होत असताना सोबत कलश घेतलेल्या सुवासिनी होत्या. पुष्पवृष्टी करण्यात येत होती. ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, खजिनदार मगनलाल पटेल, कथा सोहळ्याचे मुख्य यजमान रामनिवास इंदाणी, सतीशचंद्र इंदाणी, दैनिक यजमान श्रीगोपाल मणियार, पुरुषोत्तम पटेल, विजय झंवर, मधुसूदन सारडा तसेच हिरालाल पटेल, बजरंग दरक, डॉ. विजय भंडारी, लक्ष्मीनारायण जाजू, रामेश्वर बिहाणी, शरद झवर, सोमनाथ नजन, पुरुषोत्तम नावंदर, मुकुंद जाजू आदीच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून महाराजांना सन्मानित करण्यात आले. पं. विजय मिश्रा यांनी पौरोहित्य केले. सूत्रसंचालन हर्षा गुजराथी यांनी केले.
स्वागतपर मनोगत व्यक्त करताना नंदलाल मणियार यांनी १९८३ सालापासून रामकृष्ण परिवार धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. युवा आणि महिलांना सोबत घेऊन ट्रस्टचे कार्य शिस्तबध्दरितीने अखंडपणे सुरू आहे. राधाकृष्ण महाराजांच्या श्रीमुखातून संत मिराबाई चरित्र सलग तीन दिवस श्रवण करण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभले आहे. या कथा सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मी स्वागत करून अभिनंदन करतो, असे सांगितले. राधाकृष्ण महाराज पुढे म्हणाले, सासरी मुलींनी अत्याचार, अनाचार सहन करू नये पण घरातील सर्वांना समजून घेऊन त्यांचे स्वभाव ध्यानी घेऊन कुटुंब जपण्याचा, सासरची मान उंचावण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. प्रत्येक आईने आपल्या मुलीला सहन करण्याचे ज्ञान द्यावे. सासुरवाडीला जावयाला जसा मान मिळतो तसा सुनबाईला सासरी मान मिळाल्यास कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी होतील. सुनबाईस सासरी जाताना आपल्या माहेरी चालल्यासारखा आनंद वाटला पाहिजे. मुलींनी गर्भ संस्काराचे महत्व अत्यंत सावधानतेने समजून घेतले पाहिजे. घरातील आजी-आजोबा संस्काराची खाण असतात. ज्या मुलांना आजी-आजोबा मिळतात ती मुले भाग्यशालीच असतात. आज २०-२२ वर्षाचे युवक-युवती मनोरंजनास आनंद समजतात. खाणे-पिणे-मजा करणे, नवनवीन कपडे खरेदी करणे, दूरवर फिरायला जाणे, नाचणे हे त्यांना जीवन वाटते. जीवनाची अर्धी यात्रा पार करताना आपल्यास भगवंताने जीवन कशासाठी दिले? याचे भानही त्यांना नसते, ही वस्तुस्थिती आहे. मिराबाईला बालपणीच भगवान श्रीकृष्णाला भेटण्याची आस लागली होती. ती बाल्यावस्थेत कथा कीर्तन श्रवण करायची म्हणून तिला भगवान श्रीकृष्णाच्या हृदयस्थानी स्थान मिळाले. आद्य शंकराचार्यांनी वयाच्या ३२ वर्षात धर्म रक्षण्यासाठी चार पीठ आणि विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. फार कमी लोकांना आपल्या जीवनाचे लक्ष्य समजते. संतांचे प्रेम सान्निध्य सौभाग्यानेच प्राप्त होते. हनुमंताने आपल्या हृदयात प्रभू श्रीराम आहेत हे छाती फाडून दाखवून दिले तसे संत सावता माळी यांनी हृदयातील विठ्ठलाचे दर्शन घडवले, अशी भगवंताची भक्ती आपल्याला करता आली तर जीवनातील परमानंद मिळेल. जीवन सार्थकी होईल, असे राधाकृष्णजी महाराजांनी विविध दाखले देत सांगितले.
जब संत मिलन हो जाए। तेरी वाणी हरी गुण गाए ।। तब इतना समझ लेना। अब हरी से मिलन होगा ।।
तसेच दूर नगरी बडी दूर नगरी। कैसे आऊ रे सावरीया तेरी गोकुलनगरी ।।
या गीतासह मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत या भावमधूर गीतांवर स्त्री-पुरुष भाविकांनी चांगलाच ठेका धरला. कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी स्त्री-पुरूषांची अलोट गर्दी झाल्याने श्री राधाकृष्ण सेवा ट्रस्टमधील सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून आले