नगर – नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याने त्याच्या भीतीने शेतकरी, शेतमजूर रात्रीच नव्हे तर दिवसाही शेतात जायला घाबरू लागले आहेत, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याचे चित्र गावागावात दिसत आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली गहू, हरबरा, ज्वारीची पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे शेतात जावे तर बिबट्याची भीती आणि नाही जावे तर पिकांचे नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात काळ्याचा डोंगर, विठ्ठलवाडी, शहा डोंगर, कामरगाव व पिंपळगाव कौडा गावच्या शिवेचा परिसर या भागात दररोज कुठेना कुठे बिबट्या दिसत आहे. ७ फेब्रुवारीला रात्रीही एका शेतकऱ्याला शेतात बिबट्या दिसला. त्याने त्याचा व्हिडीओ ही मोबाईल मध्ये काढून वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे.
सारोळा कासार च्या बारेमळा परिसरातही गेल्या ३-४ दिवसांपासून एक मादी बिबट्या आणि त्याचे २ बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मळ्यात राहणारे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सायंकाळ नंतर घराबाहेर पडायला घाबरत आहेत. अनेक जण रात्रीच नव्हे तर दिवसही शेतात जायला धजावत नाहीत. त्यामुळे या परिसरातही शेतीची कामे ठप्प आहेत.
अशीच परिस्थिती भोरवाडी गावच्या परिसरात भोरवाडी ते चास रस्त्यावरील डोंगर भागात आहे. याशिवाय मेहेकरी, बारदरी व चांदबीबी महालालगत असलेली गावे, जेऊर, ससेवाडी, चापेवाडी, मांजरसुंबा, विळद या परिसरातही बिबट्यांचा वावर असल्याने याचा परिणाम आता शेती व्यवसायावर झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
बिबट्यामुळे एकीकडे नागरिक घाबरले असताना विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे उपलब्ध केले जातात पण त्यात ठेवलेल्या भक्षाची सर्व व्यवस्था परिसरातील शेतकऱ्यांनाच करावी लागत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.