लिलाबाई झोडगे यांना सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार

0
24

नगर – फिनिस सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथील श्रीमती लिलाबाई भाऊसाहेब झोडगे यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. शुलेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या शिव पुराण कथेच्या कार्यक्रमात लिलाबाई झोडगे यांना पद्मश्री पोपटराव पवार व ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश संघचालक नानासाहेब जाधव, उद्योजक महेश झोडगे, अण्णा चौधरी, फिनिस फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते. लिलाबाई झोडगे या सर्वसामान्य कुटुंबातून येवून पतीच्या निधनानंतर बिकट परिस्थितीत भाजी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या मुलाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन उद्योजक म्हणून घडविले. त्या सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्याने योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य उद्योजक महेश झोडगे करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी मुलांना सुशिक्षित करुन घडविले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. महिला समाज घडविण्याचे कार्य करतात. महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजविण्याची गरज आहे. लिलाबाई झोडगे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.