मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
19

दुधाचा पेला 

एकदा फार मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे लोकांवर फार मोठी आपत्ती कोसळली. पाऊस, पाणी नसल्यामुळे पीकपाणी आले नाही. प्राण्यांना चारा मिळेना. माणसांना खायला अन्नधान्य मिळेना. तप्त उन्हामुळे लोकांचा जीव नकोसा झाला. त्या वस्तीत सारेच लोक मोलमजुरी करून पोट भरणारे होते. २ ते ४ जण गर्भश्रीमंत लोक होते. त्यांच्या शेतीवाडीवर गावकरी मोलमजुरी करून आपले गुजराण करीत असत. त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे त्या गर्भश्रीमंतांच्या शेतावरही मजुरांना काम मिळाले नाही. सहानुभूती म्हणून त्या शेठजींनी काही दिवस सर्व मजुरांना सांभाळले. शेवटी मजुरांनीच स्थलांतर करण्याची परवानगी मागितली. नाईलाजाने गावातल्या श्रीमंतांनी त्यांना परवानगी दिली. त्यानंतर गावातले मजूर कुठे जायचे याचा विचार करू लागले. तेव्हा त्यांना एका राज्याचा पत्ता समजला. त्या राज्यात जाण्याचा विचार त्या मजुरांनी केला. काही दिवस प्रवास केल्यानंतर मजुरांचा तो ताफा दुष्काळ नसलेल्या राज्याच्या वेशीपाशी आला. अनोळखी लोक राज्यात प्रवेश करताना बघून वेशीवरच्या सैनिकांनी त्यांना अडवले आणि वेशीपाशीच थांबायला लावले. राजाला वेशीपाशी अनोळखी लोक येऊन थांबल्याची वर्दी देण्यात आली. तेव्हा राजाने आपला दूत त्या लोकांकडे पाठवला. ते कोण लोक आहेत, हे तपास करून यायला सांगितले. राजाची आज्ञा मिळताच दूत तपास करून आले. त्यांनी राजाला ते मजूर कशासाठी आले त्याबद्दलची माहिती सांगितली. आणि म्हटले की, ’ते आपल्या राज्यात आश्रय मागत आहेत.’ त्या दूतांचे बोलणे ऐकून राजा विचारात पडला. राजाने आपल्या प्रधानाला बोलावून सांगितले की, ’या लोकांना आपल्या राज्यात राहू द्यायचे का?’ त्यावर प्रधान म्हणाला, ’मी त्यांची परीक्षा घेतो, नंतर आपण ठरवू. ते आपल्या राज्यात कसे राहतील ते आपल्याला समजेल! प्रधानाने त्या लोकांच्याकडे दूतांकरवी दुधाने भरलेला पेला पाठवला. त्या मजुरांमध्ये एक अतिशय हुशार माणूस होता. त्याला दुधाच्या पेल्याचा अर्थ समजला. त्याने त्या पेल्यात साखर टाकून चमच्याने दूध ढवळून परत पाठवले. प्रधानाने राजाला सांगितले. आलेले मजूर आपल्या राज्यात दुधातल्या साखरेसारखे समरसून राहू इच्छितात. राजाने तात्काळ त्या लोकांना राज्यात राहायला परवानगी दिली. तात्पर्य : मनमिळावू स्वभावामुळे परका का असेना माणूस सर्वांना प्रिय वाटतो