जखमेवर चुना वा हळद लावणे योग्य आहे का?

0
35

जखमेवर चुना वा हळद लावणे योग्य आहे का?

जखमेवर चुना वा हळद लावण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते. खेड्यात व शहरातही, जखम झाल्यास आजही लोक हळद वा चुना लावतात. हळद वा चुना लावल्यास रक्त यायचे थांबते, हे खरे आहे; पण केवळ एवढ्याच कारणासाठी जखमेवर हळद वा चुना लावणे योग्य आहे का? हळद ही जंतूची (जिवाणूंची) वाढ होण्यास प्रतिबंध करते. चुन्यामुळे जखमेच्या आसपासचा भाग जाळल्यासारखा, निर्जंतुक होतो. हे झाले काही फायदे; पण याचे तोटेही आहेत. हळद शुद्ध नसेल तर (म्हणजे तिखट, हिंग मिसळलेले असेल), जखमेची आग होऊन ती चिघळू शकते. इतर काही कचरा असेल तर जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ शकतो. जखमेला चुना लावल्यास जखम भरून आल्यानंतर त्वचेवर विद्रूप असा व्रण येतो. आजकाल जंतुनाशनासाठी व जखम बरी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक अशी औषधे उपलब्ध आहेत.

रक्तस्त्राव होणारी जखम साबणाच्या पाण्याने वा सौम्य डेटॉलने स्वच्छ धुवावी. त्यावर कापसाने टिंचर बेन्झाईन वा आयोडीन लावावे. त्याने रक्तस्त्राव थांबेल व जखमेत जंतू असतील तर ते मरतील. जखमेत पू वगैरे झाला असेल तर दररोज ती डेटॉलने धुवावी व त्यावर निओस्पोरीनची पावडर वा सोफ्रामायसीन मलम लावावे. शुद्ध हळद जखमेवर लावणे उपयुक्त आहे. चुन्याने मात्र त्वचेवर विद्रुप व्रण येऊ शकतो. मुख्य म्हणजे अत्यंत परिणामकारक औषधे उपलब्ध असल्याने असे उपाय न करता डेटॉल बेन्झाईन वा सोफ्रामायसीनचा वापर करावा; हेच बरे.