काही लोकांचे पाय खूप जाड का असतात?

0
60

काही लोकांचे पाय खूप जाड का असतात?

पायावर सूज आल्याने पाय जाड दिसतात. पायाला लागले वा पाय मुरगळला तर सूज येते व वेदना होतात. उच्च रक्तदाब वा मूत्रपिंडाच्या विकारातही पायावर सूज येते. ती दोन्ही पायांवर असते. औषधे दिल्यास अशी सूज कमी होते. काही व्यक्तींमध्ये मात्र एकच पाय खूप म्हणजे खूपच जाड, जणू हत्तीच्या पायासारखा जाड झालेला असतो. हा एक रोग असून त्याचे नाव हत्तीरोग असे आहे. वूचेरेरीया बॅन्क्राफ्ती नावाचा जंत लिंफ वाहून नेणार्‍या नलिकेमध्ये अडकून बसतो. त्यामुळे लिंफ साठतो व पाय सुजतात. यूलेस नावाचा डास चावल्याने या जंतांच्या अळ्या रोगी माणसापासून निरोगी माणसाच्या रक्तात जातात. या अळ्या वाढून त्यांचे प्रौढ जंतात रूपांतर होते. या काळात थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे; अशी लक्षणे अधून मधून दिसतात. याच वेळी रोगनिदान झाले, तर उपचार परिणामकारक ठरतात.

रोगनिदानात जंताच्या अळ्यांसाठी रक्ताची तपासणी करतात. ताप व लिंफ ग्रंथी सुजलेल्या असताना डायएथील कार्बामाझीन हे औषध देतात. त्याने अळ्या मरतात व रोग बरा होतो. एकदा जंत मोठा होऊन लिंफ वाहिनीत अडकला व पायावर सूज आली की, या औषधाचा उपयोग तितकासा होत नाही. शस्त्रक्रिया करून पायावरची सूज कमी करता येते, पण ही एक किचकट शस्त्रक्रिया असते. हा रोग व्यंग निर्माण करतो व तो एक जुनाट रोग बनतो. त्यामुळे रोग न होऊ देणेच योग्य ठरते. यूलेस या घाण पाण्यात पैदास होणार्‍या डासांचा नायनाट व डासांच्या चावण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, या दोन उपायांनी हत्ती रोगाचा प्रतिबंध करता येईल.