ताप का येतो?

0
26

ताप का येतो?

शरीराचे तापमान ९८.७० फॅरनहाईट वा ३६ ते ३७.५० सेल्सीयस इतके असते. मानव उष्ण रक्ताचा प्राणी आहे. सभोवतालीचे तापमान- १५० सेल्सीयस (जसे लडाख, श्रीनगरमध्ये असू शकते) ते ४७० सेल्सीयस (जसे राजस्थान, विदर्भात असू शकते) पर्यंत बदलत राहिले, तरी आपले शरीर स्वतःचे तापमान ९८.७० फॅरनहाईट इतकेच ठेवते. हे कसे होते याचा विचार केल्यास लक्षात येते की, मेंदूमध्ये तापमान नियंत्रणाचे केंद्र असते. या केंद्राच्या कार्यामुळेच तापमान नियंत्रणाखाली राहते. दिवसभरात तापमानामध्ये १.५० सेल्सीयस एवढा बदल सामान्यपणे होऊ शकतो. यापेक्षा जास्त बदल झाला तर मात्र आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शरीरात चयापचयामुळे ऊर्जा निर्माण होते तसेच पर्यावरणातूनही शरीर ऊर्जा मिळवते. शरीरातील ऊर्जा थंड पदार्थापर्यंत संवहित होते, तसेच पर्यावरणाचे तापमान कमी असेल तर पर्यावरणातही संवहित होते.

घामाद्वारे शरीर ऊर्जा बाहेर टाकते, कारण अशावेळी घामाच्या बाष्पीभवनात ती वापरली जाऊन शरीर थंड होते. याउलट थंडीच्या काळात शरीर उष्णता साठवून ठेवते. जंतूच्या संसर्गावर प्रतिकार म्हणूनही शरीर तापाच्या रूपाने प्रतिसाद देते. या वाढलेल्या तापमानामुळे शरीरात शिरलेल्या जंतूंची वाढ थोपवली जाते. जंतूच्या प्रभावामुळे काही रासायनिक पदार्थ बाहेर पडतात, ज्यांच्यामुळे मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्राचे काम बिघडते व ताप येतो. हिवतापासारख्या रोगात म्हणूनच ताप येतो. अशा तापात येणार्‍या हुडहुडीमुळे शरीर उष्णता बाहेर टाकायच्या ऐवजी शरीरात अधिक उष्णता निर्माण करते, कारण तापमान नियंत्रण केंद्रात बिघाड निर्माण झालेला असतो. क्रोसीनसारख्या गोळीने ताप उतरतो; पण नुसता पाय उतरवण्यापेक्षा ज्या कारणाने ताप आला आहे, त्या कारणाचा समूळ नायनाट करणे आवश्यक असते. ताप जास्त असल्यास शरीर गार पाण्याने पुसणे, कपाळावर गार पाण्याच्या, पट्ट्या ठेवणे या उपायांनीही ताप उतरतो.