लहान व मोठा मेंदू यात काय फरक असतो?
लहान व मोठा मेंदू हे मानवाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचे महत्त्वाचे भाग आहेत. लहान व मोठा ही विशेषणे त्यांच्या आकारावरून पडली असती, तरी त्यांच्या कार्यामध्येही फरक आहे. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शरीरावर संपूर्ण नियंत्रण ठेवणारा हा ‘बॉस’ आहे. मेंदूच्या आज्ञेवाचून हालचालीच काय, कोणतीच क्रिया होत नाही. मोठा मेंदू हा स्मरणशक्ती, प्रवृत्ती, हालचाली, बोलणे, शिकणे, स्वरक्षण करणे, शरीराचे व्यवहार सुरळीत चालवणे यासाठी कार्यरत असतो. डोयाच्या पुढच्या भागात हा मेंदू असतो. शरीराचा तोल सांभाळणे, हे लहान मेंदूचे काम. याखेरीज सूक्ष्म अशा हालचालींसाठी याच मेंदूचे नियंत्रण आवश्यक असते.
लहान मेंदू डोयाच्या मागच्या भागात असतो. मोठा मेंदू रोगग्रस्त झाल्यास स्मरणशक्ती जाणे, अर्धांगवायु होणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात. याउलट लहान मेंदू रोगग्रस्त झाला तर स्नायूंच्या हालचालीत सुसूत्रता राहत नाही. बोलण्यात विकृती निर्माण होते, हात थरथरतात व चाल बदलते. आपल्या लक्षात आले असेल की, लाखो पेशींचे बनलेले मेंदूचे हे भाग आपले कार्य चोखपणे बजावतात, म्हणूनच व्यक्ती संपूर्णपणे निरोगी राहू शकते.