उच्च रक्तदाब म्हणजे काय?

0
69

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

तुमच्या घरी आजी-आजोबा, काका-मामा व कोणा ओळखीच्यांना तरी रक्तदाबाचा त्रास असणारच. बरेचदा लोक ब्लडप्रेशरचा त्रास आहे असे सांगतात. यातून रक्तदाब व ब्लडप्रेशर असणे हाच रोग आहे असे तुम्हाला वाटू शकेल! पण ते चुकीचे आहे. हृदय हे विहिरीवर बसवलेल्या पंपासारखे कार्य करते. सारखे आकुंचन-प्रसरण पावून हृदय दाबाखाली रक्त सर्व शरीरभर पोहोचवते. रक्त दाबाखाली पाठवले जाते म्हणूनच झोपल्यावर, बसल्यावर, उभे राहिल्यानंतर वा खाली डोके-वर पाय असे राहिले तरी शरीराच्या सर्व भागात ते पोहोचू शकते. या दाबालाच रक्तदाब असे म्हणतात. हा रक्तदाब मोजताना तबकडीसारख्या वा पार्‍याच्या यंत्राने मोजतात. सर्वसामान्यतः निरोगी प्रौढ माणसाचा रक्तदाब १२०-८० इतका असतो. (तो पार्‍याचे मिमी. असा सांगितला जातो) यातील १२० म्हणजे हृदय आकुंचित असतानाच दाब (सिस्टोलिक) व ८० म्हणजे हृदय प्रसरण पावलेले असतानाच (डायस्टोलिक) दाब होय. सिस्टोलिक रक्तदाब १६० च्या वर किंवा डायस्टोलिक रक्तदाब ९५ च्यावर असल्यास त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. भारतात २० ते ६० वर्षाच्या वयोगटात शहरी भागात ७% पुरुषांना व ६% स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. वाढत्या वयाबरोबर रक्तदाब हळूहळू वाढतो.

आनुवंशिकता हेही उच्च रक्तदाबामागील कारण असू शकते. लठ्ठ व्यक्ती, जास्त मीठ (दिवसाला ७ ते ८ ग्रॅमहून जास्त) खाणार्‍या व्यक्ती, आहारात जास्त तूप खाणारे, मद्यपान करणारे, व्यायाम न करणारे व मानसिक ताणतणाव असलेले अशा सर्वांना उच्च रक्तदाब होण्याची शयता इतरांहून जास्त असते. मूत्रपिंड व इतर इंद्रियाच्या आजारामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. सतत डोके दुखणे, हातापायाला कंप सुटणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, हातापायांची जळजळ होणे, छातीत दुखणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. अशा व्यक्तींनी तात्काळ डॉटरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला मीठ कमी करणे, मद्यपान सोडणे, आहारातील मेदपदार्थ कमी करणे व योगाद्वारे चित्तशांती या उपायांनी वा काम्पोजसारख्या गोळ्यांनी रक्तदाब आटोयात येऊ शकतो. पण रक्तदाब जास्त असेल, तर रक्तदाब कमी होण्याच्या गोळ्या घ्याव्याच लागतात.

सामान्यतः ही औषधे नंतर आयुष्यभर घ्यावी लागतात. रुग्णाने स्वतः च्या मनाने डोस कमी करू नये व गोळ्या बदलू किंवा बंद करू नयेत. अन्यथा मेंदूतील रक्तस्राव, अर्धांगवायूचा झटका अशा भयंकर परिणामांना त्याला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारविहारात सुयोग्य बदल व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घेतलेली औषधे याखेरीज इतर कोणताही उपाय करायची गरज नसते. असे केल्यास आयुष्यभर तो नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाचे निदान लवकर झाल्यास तात्काळ उपचार सुरू होतात व नंतरचे दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी चाळीशीत प्रवेश केलेल्या सर्वच व्यक्तींनी रक्तदाब तपासून घ्यावा. दुसरे म्हणजे रुग्णांनी स्वतः च्या रक्तदाबाच्या नोंदी व उपचाराची माहिती एका डायरीत व्यवस्थित लिहून ठेवावी, म्हणजे पुढील उपचारात त्याचा फायदा होतो.