वजन व उंचीचे प्रमाण नेमके किती असावे
व्यक्तीची वाढ किती व्हावी याच्या मर्यादा आहेत. आनुवंशिकता हे वजन व उंची जास्तीत जास्त किती वाढेल याचे कारण असले तरी कुपोषण, गंभीर रोग, जंतांची लागण, थायरॉईड ग्रंथीचा रोग आदी कारणांनी वाढीवर परिणाम होतात. त्यामुळे एखादी व्यक्ती अनुवंशिकतेमुळे खुजी आहे वा खूप लठ्ठ आहे असे म्हणण्यापूर्वी, इतर सर्व रोग नाहीत याची तपासण्यांनी खात्री करणे अत्यंत आवश्यक असते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन २.८ किलो असते. ते पहिल्या वाढदिवसाला तिप्पट म्हणजे ८.४ किलो, तर दुसर्या वाढदिवसाला ११.२ किलो इतके होते. त्यानंतर दर वर्षाला (१८ वर्षांपर्यंत) २ ते २.५ किलो वजन वाढते. त्यानंतर तुमचे वजन किती आहे हे पाहण्यासाठी एक सोपे समीकरण आहे.
सें. मी. मधील तुमच्या उंचीतून १०० वजा केल्यास येणारी संख्या म्हणजे तुमचे कि. ग्रॅ. मधील वजन. अर्थात यापेक्षा १०% कमी वा जास्तही वजन चालू शकेल. जन्माच्या वेळी बाळाची लांबी ५० सें. मी. तर पहिल्या वाढदिवसाला ती ७५ सें. मी. इतकी असते. दुसर्या वाढदिवसाला ती ८७.५ सें. मी. आणि त्यानंतर दरवर्षी ५ ते ६ सें. मी. इतकी वाढते. जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षेपर्यंत उंची वाढू शकते. भारतात पुरुषांची सरासरी उंची वाढू शकते. भारतात पुरुषांची सरासरी उंची साडेपाच फूट, तर स्त्रियांची उंची ५ फूट असते. पुरुषाचे सरासरी वजन ६० किलो, तर स्त्रियांचे सरासरी वजन ५० किलो असते. कोणत्या वयासाठी किती वजन व उंची असावी, याचे तक्ते उपलब्ध असतात. तत्यावरूनही उंची व वजन काढता येते.