उपास करणे चांगले की वाईट?
उपास करणे म्हणजे धार्मिक असणे, असा समज आढळून येतो. उपास करणे चांगले की वाईट, या प्रश्नाचा विचार आपण आरोग्याच्या दृष्टीने करणार आहोत. निसर्गोपचारात उपवासाचे महत्त्व खूपच आहे. अजीर्ण झाल्यावर काही खावेसे वाटत नाही, करपट ढेकरा येतात; त्यामुळे आपोआपच उपास घडतो. तुम्ही अनुभवले असेल की, अशा उपासानंतर तुम्हाला बरे वाटते. यावरून निष्कर्ष काढता येईल की, पचनसंस्थेवर जास्त ताण पडला असेल तर उपास करून तिला विश्रांती देणे चांगले. आमच्या एक मावशी खूप उपास करतात. मंगळवार देवीचा, गुरुवार बालाजीचा, तसेच एकादशी, चतुर्थी एक ना दोन. पुन्हा सगळे उपास कडकडीत. “मी बई तोंडात पाणीसुद्धा टाकत नाही…” इति मावशी. त्यामुळे काही वेळा आठवड्यात तीन-तीन दिवस त्या अन्नपाण्यावाचून असतात.
याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झालाय. शरीर अगदीच तोळामासा झाले आहे. उपासाने त्यांना किती पुण्य मिळालंय, हे देवच जाणे; पण स्वर्गात जायचे झाले तर वजनाची अडचण येऊ नये याची तजवीज त्यांनी आधीच करून ठेवलीय! आठवड्यात एकदा उपास करणे चांगले, कारण त्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो; परंतु उपासाचा अतिरेक नको. विशेषतः मधुमेह, क्षयरोग, रक्तदाब, हृदयरोग, इतर दीर्घ मुदतीचे रोग असलेल्या व्यक्तींनी (ज्या रोगांमध्ये दररोज औषधे घ्यावी लागतात) डॉटरांना विचारून मगच उपास करावेत. मधुमेहात तर उपासाचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे चांगले. जिवंत राहिल्यास खूप पुण्य मिळवता येईल. म्हणतात ना, “सिर सलामत तो पगडी पचास!”