‘महावितरण’च्या आशिर्वादाने शहर दररोज अंधारातच

0
43

नगर – कर्तव्याची कोणतीही जाणीव वा जबाबदारीचे गांभीर्य नसलेल्या, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ (म्हणजेच एम एस ई बी) यांच्या आशीर्वादाने शहरात रात्री रोजचं वीज गायब झालेली असते हे भयानक वास्तव आहे. पूर्वी जोराचा पाऊस आला की लाईट जात असे. हा संस्कार प्रत्येकावर असायचा. अन् हे साहजिकच असे… परंतु हल्लीच्या काळात पावसाची चाहूल जरी असली की तासभर आधीच घरातील, रस्त्यावरील दिवे गायब होतात. अन् सारं शहर अंधारात गुडूप होऊन जाते ही शोकांतिका आहे. याचं दुःख ना कोणा कर्मचार्‍याला की कोणत्या अधिकार्‍याला आहे. या लोकांना फक्त नोकरीतील हक्क समजतात, कर्तव्य नाही याचाच अर्थ पुर्वीच्या कर्मचार्‍यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असायची, नोकरी करतांना त्यांना त्याची गरिमा असायची. अर्थात सगळ्याच सरकारी संस्था अशाच असायच्या… अन् आज…? आम्हीच हे स्वीकारलं आहे… अंधारात राहणं हा आमच्या जगण्याचा भागच झाला आहे. दीड दोन तास सावेडी उपनगरात वीज गायब झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याची कोणालाही ना खंत वाटते ना लाज वाटते. हे रोजचंच झालं आहे. या विभागात जे कर्मचारी भरले आहेत ते अगदीच नवखे असावेत. त्यांना या शहरातील विजेच्या जाळ्याची कल्पना नसावी, अथवा हे कर्मचारीच कामचोर असावेत, किंवा यांना बोलणारे कोणी राहिले नसावेत किंवा यांना कर्तव्यात कसूर केली तरी शिक्षा देण्याची कोणाची हिंमत नसेल… किंवा जनतेला हे घाबरत नसावेत…! असेच वाटते असे माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांनी म्हटले आहे.

अहमदनगर हे खेडे आहे की महानगर? नागरिकांचा सवाल

अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. तसेच अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे आहेत. या शहराने त्याचं इतिहासात जगावं, त्या पद्धतीने आपली गुजराण करीत रहावं, पूर्वी जशी घरात, रस्त्यांवर अंधारात पेटत्या मशाली असायच्या. आजही त्याचं अनुकरण केलं म्हणजे इतिहासाला उजाळा मिळेल. यासाठी आमचाही हातभार लावण्यासाठी, हा वारसा टिकविण्यासाठी आम्हीं दररोज हे शहर, त्याचं उप शहर म्हणजेच सावेडी अंधारात ठेवत राहू… कदाचित यासाठीच या शहरातील विज वितरण महामंडळ म्हणजेच पूर्वाश्रमीची एम.एस. ई. बी नगर वासियांना अंधारात ठेवत असेल…! किती छान कल्पना आहे या महामंडळाच्या येथील अधिकार्‍यांची अन् कर्मचार्‍यांची… नाहीतरी आम्हीही लाज सोडलीच आहे. गुडूप अंधारात चोर्‍या करणार्‍या चोरांचा ही वीज मंडळाचे कर्तव्य बजावणारे अधिकारी सहानुभूतीने व्यापक विचार करतात ना..! हे खेडे आहे की महानगर… की आपलीच जगण्याची पातळी खालावली आहे अशी खंत माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली आहे.