मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
19

काजू शेंगदाण्याहून चांगले असतात का?

शेंगदाणे खाणार्‍यांना काजू खाणार्‍यांचा नेहमीच हेवा वाटेल! हो की नाही? कारण एक किलो काजूच्या किंमतीत ८-१० किलो शेंगदाणे सहज घेता येतील. एवढे महाग काजू खायला मिळाले तर तब्येत सुधारेल, असेही अनेकांना वाटत असेल; पण हे खरे आहे का? या दोहोंचा तुलतात्मक अभ्यास केल्यास असे लक्षात येते की काजूमध्ये ४६.९ टक्के इतके मेदपदार्थ असतात, तर शेंगदाण्यात त्यांचे प्रमाण ४० टक्के इतके असते. या उलट शेंगदाण्यामध्ये २६.७ टक्के प्रथिने असतात. काजूमध्ये प्रथिनांचे प्रमाण याहून कमी असते. शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची खूप गरज असते. मेद पदार्थापासून ऊर्जा मिळते. काजू व शेंगदाणे या दोहोंपासून व जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच लोह मिळते.

वरील तुलनेवरून असे लक्षात येईल, की काजू व शेंगदाण्यात पोषक द्रव्यांच्या दृष्टीने फारसा फरक नसतो. शरीराला प्रथिने व मेद पदार्थ तसेच जीवनसत्त्व ‘ब’ व क्षार दोहोंपासून सारख्याच प्रमाणात मिळतात; परंतु किंमतीतील तफावत लक्षात घेता काजूपेक्षा शेंगदाणे खाणे श्रेयस्कर ठरेल. अर्थात ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे काजू खाणे शय आहे, त्यांनी ते जरूर खावेत, पण काजू फार पौष्टिक आहेत या भ्रमात राहून न परवडताही ते खरेदी करून पुरवून खाणे मात्र नक्कीच टाळायला हवे. कारण एक किलो शेंगदाणे व त्याच किमतीत येणारे काजू यांची पोषणाच्या दृष्टीने तुलना केल्यास शेंगदाणे सरस ठरतील. त्यामुळे किमतीचा विचार केल्यास काजूहून शेंगदाणेच चांगले, असे म्हणावे लागेल.