खासदार निलेश लंके यांचे समर्थकॲड. राहुल झावरेंच्या वाहनाची तोडफोड करत केली मारहाण

0
54

पारनेर बसस्थानकाजवळ विखे समर्थकांनी हल्ला केल्याचा संशय

पारनेर – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेर मध्ये विजयी उमेदवार निलेश लंके आणि पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राजकीय वादातून गुरुवारी (दि.६) दुपारी चांगलाच राडा झाला आहे. लंके यांचे समर्थक आणि निकटवर्तीय असलेले अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर विखे समर्थकांनी पारनेर बसस्थानकाजवळ जीवघेणा हल्ला केला आहे. यात झावरे यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या कार च्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुयात राजकारण पेटले असून समर्थक आमनेसामने आले आहेत.

लंके यांचे समर्थक अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. निवडणुकांनंतर पारनेर तालुयात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून अ‍ॅड. राहुल झावरे यांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.