मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
24

वनस्पती तूप कसे तयार करतात?

तूप व तेल हे दोन्ही मेदपदार्थांचेच प्रकार आहेत. दोहोंतील महत्त्वाचा फरक म्हणजे सर्वसामान्य तापमानाला तूप घन अवस्थेत, तर तेल द्रव अवस्थेत असते. रासायनिकदृष्ट्याही दोन्ही कार्बन, हायड्रोजन व ऑसिजनपासून बनलेले असतात. दोन्हींमध्ये मेदाम्ले असतात. सुयोग्य तापमान व दाबाच्या अवस्थेत आणि रासायनिक क्रियेला पूरक अशा घटकांच्या उपस्थितीत पाण्याचा रेणू व वनस्पतीज तेल यांचा संयोग (हायड्रोजीनेशन) होऊन वनस्पती तूप तयार होते. हायड्रोजीनेशन या प्रक्रियेत तेलात असणार्‍या असंपृक्त मेदाम्लांचे रूपांतर संपृक्त मेदाम्लात होते व अरॅचिडोनीक, लिनोलेइक व लिनोलेनीक या मेदाम्लांचे प्रमाण खूप कमी होते. तुपाचा मुख्य फायदा म्हणजे ते घट्ट असते व कोणत्याही हवामानात चांगले टिकते. आरोग्याच्या दृष्टीने तुपापेक्षा तेल खाणे चांगले.

संपृक्त मेदाम्ले जास्त असलेले मेदपदार्थ नेहमी सेवन केल्यास रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते व त्या रोगग्रस्त होतात. हृदयविकारही होतो. याउलट असंपृक्त मेदाम्ले अधिक असलेले मेदपदार्थ म्हणजेच तेल सेवन केल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतात. वनस्पती तूप अतिप्रमाणात खाणे अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरते. आजकाल वनस्पती तुपाचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी १०० ग्रॅम वनस्पती तुपामध्ये २५०० आंतरराष्ट्रीय एकके जीवनसत्त्व ‘अ’ व १७५ आंतरराष्ट्रीय एकके जीवनसत्त्व ‘ड’ मिसळलेले असते.