चव कशी समजते?
एखादा पदार्थ जिभेवर ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याची चव आपल्याला समजते. पण आपण ज्याला चव म्हणतो त्यात चवीची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवणार्या स्वादांकुरात उष्णता, स्पर्श व वासाचे ज्ञान या सर्वांचा समावेश होतो. लोरोफॉर्मचा गोडसर वास हा प्रामुख्याने स्वादांकुर उत्तेजित झाल्यामुळेच येतो. सर्दी झाल्यावर अन्न बेचव लागते. वासाचे ज्ञान होत नसल्यामुळेच नाक दाबल्यास उकडलेला कांदा व सफरचंद यांची चव जवळपास सारखीच लागते. चवीमध्ये आपल्याला जाणवणारे सूक्ष्म फरक हे बर्याचदा या गोष्टींच्या वेगळ्या अशा वासामुळे असतात. अशी ही चव आपल्याला मुख्यतः जिभेवरील स्वादांकुरामुळे कळते. माणसाच्या जिभेवर सुमारे १०,००० स्वादांकुर असतात. गोड, आंबट, खारट व कडू या चाल मूळ चवी आहेत. जिभेच्या टोकाला गोड चव, पाठीमागे कडू, तर दोन्ही कडांना आंबट चव जास्त प्रमाणात जाणवते.
खारट चव सर्व ठिकाणी समप्रमाणात, पण जिभेच्या टोकाला सर्वाधिक जाणवते. चव कळण्यासाठी पदार्थ लाळेत विरघळावा लागतो. विरघळलेले रेणू स्वादांकुरात शिरल्यावरच चव समजते. काच, स्टेनलेस स्टील, चांदी, सोने यांची चव ते विरघळत नसल्याने आपणास कळत नाही ते त्यामुळेच! तसेच ‘तिखट’ ही चव नाही! तर तिखट वस्तूंमधील आम्लामुळे होणारा तो एक ‘दाह’ म्हणता येईल. चवीच्या संदेशाचे वहन स्वादांकुरातून चेतातंतूंमार्फत मेंदूतील चवीच्या केंद्रापर्यंत होते तेव्हा चव समजते.