खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा

0
17

समस्त मातंग समाजाची कोतवाली पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – जातीवाचक शिवीगाळ करत युवकावर खुनी हल्ला करून समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच आरोपींना अटक न झाल्यास अमरण उपोषण किंवा मोर्चा काढण्याचा इशारा समस्त मातंग समाजाच्यावतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ३० मे रोजी अभिषेक नवघिरे हे कामावरुन घरी जात असतांना जहिर इक्राम सय्यद व त्याची पत्नी लैला जहीर सय्यद व एक अनोळखी व्यक्ती यांनी नवगिरे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन कोयत्याने वार करुन जखमी केले. लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

रक्तश्राव होत असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुनही सदरील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असूनही अटक केली जात नसल्याने गोरगरीबांवर ते अन्याय करीत आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाकडून करण्यात आली आहे. तसेच आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात त्यांनी दिला आहे.