मे महिन्यात २४०१ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा आनंदऋषीजी नेत्रालयाचा नवा विक्रम

0
19

जागतिक दर्जाच्या नेत्रोपचार सुविधांचा नगरसह मराठवाड्यातील रूग्णांना मोठा लाभ

नगर – जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय सर्वांना निर्दोष दृष्टी लाभावी या उद्देशाने कार्यरत आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यात नेत्रालयात मे २०२४ या एकाच महिन्यात तब्बल २४०१ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अडीच महिन्यांच्या बाळापासून ते ९५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना नवी निर्दोष दृष्टी देण्यात नेत्रालय यशस्वी झाले आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये नेत्रालयात एकाच महिन्यात १९३० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तब्बल २० अनुभवी नेत्ररोग तज्ज्ञ आणि १६० जणांचा स्टाफ यांचे टिम वर्क तसेच आचार्य आनंदऋषीजींची महाराज यांचे आशीर्वाद आणि प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेतून ही कामगिरी शय झाली अशी भावना आनंदऋषीजी नेत्रालयाचे मेडिकल डायरेटर डॉ. अशोक महाडिक यांनी व्यक्त केली. नेत्रालयाने अवघ्या ६ वर्षात ७८ हजारांपेक्षा अधिक रूग्णांवर नेत्रोपचार केले आहेत. यात लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांचा समावेश आहे. नेत्रालयात ५ आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑपरेशन थिएटर कार्यरत आहेत. रोज सुमारे १०० नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न असतो. पाच जिल्ह्यात २० व्हिजन सेंटर आहेत. या जिल्ह्यातील एकही नेत्ररूग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शिबिरांमार्फत खेड्या पाड्यात रूग्णापर्यंत पोहचले जाते. ग्रामीण भागातील रूग्णांना नगरला आणून येथे निवासाची व्यवस्था करून शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच परत घरी नेऊन सोडताना महिनाभराचे औषधे दिली जातात. रूग्णांना बाहेरून कोणतेही औषध आणावे लागत नाही. त्यामुळे बाहेरगावचे रूग्ण एकटे येऊनही त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. नगर, बीड, धाराशिवसह मराठवाडा जिल्ह्यातील रूग्ण या सेवांचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. प्रशासन अधिकारी आनंद छाजेड यांनी सांगितले की, नेत्रालयात रेटिना शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांच्या सर्वच नेत्रशस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जातात.

काचबिंदू, कॉर्निया शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध आहे. पूर्ण वेळ रेटिना सर्जन नगर जिल्ह्यात फक्त आनंदऋषीजी नेत्रालयात उपलब्ध आहेत. रूग्ण संख्या मोठी दिसत असली तरी याठिकाणी सेवाभाव, व्यवस्थापन आणि गुणवत्तेलाही तितकेच महत्व दिले जाते. कुठल्याही परिस्थितीत सर्वोच्च गुणवत्तेची सेवा देण्यावर भर दिला जातो. त्यामुळे येथे आलेला रूग्ण समाधानाने घरी परततो. शालेय तपासणी मोहिमेंतर्गत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. २०० मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे. नेत्रालयातील ओपीडी सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ४ यावेळेत खुली असते. तसेच नगरकरांच्या सोयीसाठी ओपीडी दर रविवारीही सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत खुली असते. ज्या रूग्णांना ओपीडी सेवा तात्काळ हवी त्यांच्यासाठी लवकरच प्रिमियम ओपीडी नेत्रालयात चालू करण्याचे नियोजन आहे. नेत्रालयात उद्ययावत ऑप्टिकल शॉपही असून याठिकाणी ब्रॅण्डेड, नॉन ब्रॅण्डेड चष्मा फ्रेम, गॉगल्स तसेच सर्व प्रकारच्या ग्लासेस उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या उपचार सुविधांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून देत मोतीबिंदू मुळे कोणालाही अंधत्व येऊ नये या उद्देशाने नेत्रालय सेवा देत आहे.