सफरचंदाचा हलवा
साहित्य : दोन मोठी कडक गोल्डन
सफरचंद, अर्धा लिटर दूध, एक वाटी साखर
(कमी-जास्त आवडीनुसार), अर्धी वाटी
खवा (खव्याऐवजी जास्त दूध चालेल), एक
चमचा किंवा त्यापेक्षा कमी लिंबूरस, आवडत
असल्यास एक चमचा गुलाबपाणी, दोन चमचे
गुलकंद, खायचा केशरी रंग, बदाम, दोन चमचे
साजूक तूप.
कृति : सफरचंदाची साल व मधला
कडक भाग, तसंच बिया काढून सफरचंद
किसावं. किसाला लगेच लिंबाचा रस लावावा.
म्हणजे कीस काळा पडणार नाही. कुकरमध्ये
कीस वाफवून घ्यावा. यातलं पाणी वाया
जाणार नाही याची काळजी घ्यावी.
दुधामध्ये साखर घालून दूध उकळावं
व आटवावं. कोमट झाल्यावर त्यात खवा
कुस्करून घालावा. गुलकंद, रंग, गुलाब
इसेन्स (गुलाबपाणी) व चिमूटभर मीठ घालून
शेवटी सफरचंदाचा कीस घालावा. दुधात
घालण्याआधी कीस तूप घालून जरा गरम
करावा. हा कीस दुधामध्ये घालून मिश्रण पाच
मिनिटं गरम करावं.
देण्याआधी बदाम सोलून त्याचे तुकडे
घालावेत. वरून वर्ख लावल्यास अधिक
आकर्षक दिसतं. अशाच पद्धतीनं अननस वा
केळ्याचा हलवा करता येतो.