नगरमध्ये सुरु असलेला घरगुती गॅसचा काळाबाजार ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे उघड

0
72

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनने भांडाफोड केल्यावर २ ठिकाणी पोलिसांची कारवाई 

नगर – ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी नगर शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड केला आहे. लोकेशनचे व्हिडिओ चित्रीकरण जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकार्‍याना दाखवत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलीस व पुरवठा विभागाने मंगळवारी (दि.२८) दुपारी शहरात २ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांना जिल्ह्यातील घरगुती (१४.२ कि.ग्रॅ.) ग्राहकांचे हक्काच्या गॅस सिलेंडरचा अवैध वापर शहरातील एलपीजी वाहन चालक वाहनात भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे निदर्शनास आले होते, यापूर्वी देखील मार्च आणि एप्रिल २०२४ या महिन्यात लेखी पत्राद्वारे पुरवठा विभागाला कळविले होते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरु असल्याचे दिसत होते. यामुळे शहरात कधीही मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता पुरवठा विभागाकडून तहसीलदार, धान्य वितरण अधिकारी, सर्व गॅस कंपनी विक्री अधिकारी यांना कारवाई बाबत कळविण्यात आले होते. मात्र, तरीही महिनाभरानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने शेवटी फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या आदेशानुसार ग्राहक दक्षता कल्याण च्या काही अधिकार्‍यांनी सावेडी परिसरात येऊन गॅसचा काळाबाजार करणार्‍याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. हे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांना मंगळवारी (दि.२८) दाखवले. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आदेश दिले.

सावेडी नाका व अमरधामजवळ छापेमारी

त्यानंतर पुरवठा विभाग व तोफखाना पोलिसांनी दुपारी १ च्या सुमारास सावेडीनाका येथील हॉटेल परिचय मागे छापा टाकला व गॅसचा काळाबाजार करणार्‍या एकास संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ५ घरगुती गॅस सिलेंडर आणि एक मोटार, वजनकाटा, एक ऑटो रिक्षा, असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलिसांनी जयंत छगन भिंगारदिवे व पवन शरद भिंगारदिवे (दोघे, रा. सावेडी गाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दुसरी कारवाई ही अमरधाम स्मशानभूमी जवळ असलेल्या एका दुकानाच्या पाठीमागे करण्यात आली. तेथे ५ घरगुती गॅस सिलेंडर, एक मोटार, मोबाईल, वजन काटा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत पो.कॉ. शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून निरंजन उर्फ विशाल विजय कांबळे (रा. काटवन खंडोबा रोड, संजयनगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई वेळी ग्राहक दक्षता कल्याणचे मेघा शर्मा, कृष्णा पवार तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी सपना भोवते आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.