नगरच्या बाजारपेठेत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड

0
41

मुलीचा मामा येताच दुचाकी टाकून दोघे तरुण झाले पसार; विनयभंगासह पोसोचा गुन्हा दाखल

नगर – अल्पवयीन मुलीचा (वय १७) पाठलाग करून भर रस्त्यात तरूणाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी (दि. २७) रात्री नगर शहरातील नवीपेठ परिसरात घडला. या प्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी (दि. २८) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोन अनोळखी तरुणाविरूध्द विनयभंग, पोसो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रिण नगर शहरातील नवीपेठ येथील एका दुकानात गेल्या होत्या. त्या रात्री ९ वाजता घरी जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात पाणीपुरी खाण्यासाठी थांबल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण आले व ते त्यांच्याकडे एकटक पाहू लागले.

फिर्यादी व त्यांची मैत्रिण पाणीपुरी खाऊन झाल्यावर इचरजबाई शाळेच्या रस्त्याने जात असताना त्या दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालविणार्‍या तरुणाने फिर्यादीचा हात पकडून चिठ्ठी दिली. त्यात माझा नंबर असून, मला फोन कर असे तो फिर्यादीला म्हणाला. दरम्यान फिर्यादीने त्या तरुणाच्या ताब्यातून सुटका करून घेत तिचा मामा काम करत असलेल्या चितळे रस्त्यावरील मेडिकल गाठले. फिर्यादी व तिची मैत्रिण मेडिकलमध्ये गेल्या असता ते दोन तरुण त्यांचा पाठलाग करत तेथे आले. दुचाकी स्टॅण्डवर लावून फिर्यादीला चिठ्ठी देत असताना तिच्या मामाने त्यांना आवाज दिला. ते घाबरून दुचाकी सोडून व हातातील चिठ्ठी खाली टाकून पसार झाले. त्यानंतर पीडित फिर्यादी मुलीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या दोन अनोळखी तरुणांचा शोध सुरू केला आहे.