‘अर्बन’बँकेच्या पुण्यातील बड्या कर्जदाराला अटक न्यायालयाने सुनावली १ जूनपर्यंत पोलीस कोठडी

0
56

तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून घेतले मोठ्या रकमांचे कर्ज

नगर – नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली आहे. अक्षय राजेंद्र लुणावत (वय ३४, रा. उंड्री, पुणे) असे या कर्जदाराचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी (दि.२८) त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद्रुमा ज्वेल्स अ‍ॅेण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर केला व कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही. या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे.

लुणावत याने सन २०१५ मध्ये घेतलेल्या सहा कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेनोलॉजी या फर्मच्या नावाने मंजुर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेनोलॉजीच्या खात्यातून तीन कोटी ५ लाख रूपये माऊली ट्रेडर्स यांच्या मर्चंटस् बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याव्दारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवलेले आहे. तसेच, लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया, डॉ. निलेश शेळके व इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. या रकमा बनावट कागदपत्राच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शयता आहे. याचा तपास करण्यासाठी ७ दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.