एक सेकंद म्हणजे किती काळ आहे?

0
89

एक सेकंद म्हणजे किती काळ आहे?

काळ ही मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक, दोन निरनिराळया घटनामध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागलं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उदय झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही. तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन जाणार्‍या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सूत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली. नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करुन त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककाची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रीतीनं होणार्‍या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत किती तरी वेळा होणारी आवर्तन आहेत काय, यांचा शोध सुरु झाला. अणूंच्या आंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्यांच स्पष्ट झालं. अणुकेंद्राभोवती इलेट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं, की काही अणू आपल्या निरनिरळ्या ऊर्जापातळींमध्ये सतत वर-खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जापातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तन अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा, हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सीझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तन पुरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर, सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे.