माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो?

0
73

माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो?

जीवेत् शरदः शतम् असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांच आहे, अशी जी एक सर्व साधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे. पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो, या समजुतीला कोणता आधार आहे. कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यतिची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानानं नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या व्यतीकडे नवलाईनंच पाहिलं जातं. तेव्हा खरा प्रश्न हा आहे, की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे. त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही इतिहास पाहिला तर याचं उत्तर देणं सोपं होत नाही. कारण माणसांच सरासरी आयुर्मान वेगवेगळया कालखंडात वेगवेगळया भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांच होतं. ब्रॉन्झयुगात तर ते अठरापर्यंत घरसलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहुन दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदराचे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो. आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतित काय, सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुर्‍या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांच होतं. आज ते ६७ झालं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्युदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणार्‍या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शतिशाली औषधंही सहजगल्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे पोषणातही वेगानं प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणार्‍या सकस आणि पर्याप्त अन्नापयी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ टिकून राहत आहे. ही जी वाढ झालेली आहे, ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्याच निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठ्यामध्येच त्याच्या एकंदर आयुमर्यादेच इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन या विषयाशीच निगडीत आहे. त्यानुसार आपल्या अद्ययावत शारीरीक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं ज्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसुत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणार्‍या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधून काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गूढ उकललं, की मग, माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो या प्रश्नाचं नेटक उत्तर देणं शय होईल.