मराठवाड्याला मुबलक पाणी मिळण्यासाठी अकोले तालुक्यात नवीन धरण बांधण्यात यावे

0
21

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – मराठवाडा जल आपुर्तिसाठी विशेष बाब म्हणून नगर उत्तर जिल्ह्यात अकोले तालुयात नवीन धरण बांधावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नितीन थोरात यांनी म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान कमी झाले आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे व सध्या अस्तित्वात असलेल्या धरणातून नगर जिल्ह्यातील शेती जलसिंचन व पिण्याचे पाणी हे निळवंडे व भंडारदरा धरणावर अवलंबून आहे व त्याची आपुर्ती झाल्यानंतर ओवरफ्लोचे पाणी जायकवाडीकडे जात असते. उपरोक्त बाब लक्षात घेता प्रथमदर्शनी असे लक्षात येते की, नासिक, नगरच्या अतिरिक्त पाण्यावर जायकवाडीचे पाणी भरणा होते. ज्यावेळेस जायकवाडीचे पाणी तळ गाठते तेव्हा भंडारदर्‍याचे किंवा निळवंड्याचे पाणी मराठवाड्याला सोडा म्हणून मराठवाड्यात आंदोलने व न्यायालयीन लढाया सुरू होतात.

अशा परिस्थितीत नगर जिल्ह्याचे लोक पाणी सोडण्यास विरोध करतात व मोठ्या प्रमाणावर राज्यातच पाण्यासाठी दोन जिल्ह्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. अशा स्वरूपाची यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अकोले तालुयात योग्य त्या भौगोलिक क्षेत्राची निवड करुन त्या ठिकाणी नवीन मराठवाडा धरणाची निर्मिती केल्यास मराठवाड्यास कायमस्वरूपी स्वतःचे हक्काचे पाणी पुढील १०० पिढ्यांना मिळेल. नगर-औरंगाबाद पाणी वाद कायमस्वरूपी मिटेल. अकोले तालुयात नवीन मराठवाडा धरणाची मंजुरी शासनाने द्यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.