मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
24

काचा खाल्ल्यास काय होते?

काचा हा काय खायचा पदार्थ आहे? सर्वसामान्य माणूस तर काचा खाऊ शकत नाही. तसे कोणी केले तर त्याचा विक्रमवीर म्हणून सत्कारच होईल जीवावर बेतेल ते वेगळेच! काचा खाल्ल्या तर (म्हणजे अगदी चावून चावून!) घशात, जठरात व पोटात तीव्र अशा जळजळल्यासारख्या वेदना होतात. मळमळ, उलट्या होतात. उलटीमध्ये रक्त असते. संडासच्या जागी दुखते व संडासवाटे रक्त येते. काचांमुळे जठर वा आतडे फाटल्यास खूप रक्तस्राव होतो व व्यक्ती मरते. कधी कधी अशा जखमांतून जंतूसंसर्ग झाल्याने त्यापासूनही व्यक्ती मरू शकते. काचेत सिलिका असते. क्ष-किरण सिलीकातून आरपार जायला अडचण येते. त्यामुळे जठरात वा आतड्यात काचेचे तुकडे असल्याचे निदान त्यांच्या फिकट अशा छायाकृतींमुळे करता येते. चुकून काच खाल्ली असेल तर भात वा केळी असे पदार्थ देऊन त्यानंतर सौम्य विरेचक द्यावे. लक्षणानुरूप इतरही औषधे द्यावी लागतात. खूप बारीक केलेली काच मात्र कमी त्रासदायक ठरते. त्यामुळेच बहुदा काचा खाऊन दाखविण्याचा प्रयोग करणारे लोक काचा खूप वेळ चावून त्या अगदी पावडरसारख्या करून मग गिळत असावेत!