महानगरपालिकेतील ‘प्रशासकराज’मध्ये अर्धवट अवस्थेत रखडली शहरातील कामे

0
37

अधिकारी, ठेकेदाराच्या मनमानीमुळे व्यवसायिक, नागरिकांना मनःस्ताप

नगर – महापालिकेतील ‘प्रशासकराज’मध्ये कोणाचाच कोणाला पायपोस राहिलेला नसल्याने सध्या शहरातील सर्वच नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. ड्रेनेजची, रस्त्यांची अनेक कामे मागील काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून या कामांकडे ना अधिकार्‍यांचे लक्ष, ना ठेकेदारांचे लक्ष. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासन, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दररोज होत असलेल्या त्रासाबाबत आता सांगावे तरी कोणाला? असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहेत. अर्धवट कामे तातडीने पूर्ण करून घेण्याऐवजी आपल्या दालनात बसून कोणता ‘कर’ वाढवला तर ‘तिजोरी’ भरेल एवढा एकच ‘अजेंडा’ सध्या ‘प्रशासकराज’मध्ये राबविला जात असल्याने शहरातील व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

काही मीटरचे काम तब्बल तीन महिन्यांपासून अर्धवट

अधिकारी, ठेकेदाराच्या मनमानीमुळे व्यवसायिक, नागरिकांना मनःस्ताप शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पानसरे गल्लीतील रस्ता मागील तीन महिन्यांपासून तीन वेळा खोदून ठेवला आहे. आधी पाईपलाईनसाठी, नंतर ड्रेनेजच्या कामासाठी आणि आता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी रस्त्याची खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या भागातील व्यापारी, व्यवसायिक आणि नागरिक त्रस्त आहेत. रस्ता खोदून ठेवल्याने एकही मोठे वाहन या रस्त्याने येत नाही, त्यामुळे व्यवसायिकांना आपला माल उतरून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घंटागाडी नसल्याने कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसची गाडी येत नसल्याने टाया भरून घेणे अडचणीचे ठरत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर मोठमोठे दगडगोटे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. अनेकदा वृद्ध नागरिक पायी चालताना दगडांना अडखळून अथवा ठेसाळून खाली पडतात. अशा प्रकारे अनेकांना दुखापती झाल्या आहेत. अपघाताच्या घटनाही वारंवार घडतात. त्यामुळे या भागातील व्यापारी, व्यवसायिक आणि रहिवाशी रस्त्याच्या समस्येने बेजार झाले आहेत.

ठेकेदाराच्या ‘कासव’गतीला अधिकार्‍यांकडूनही पाठबळ 

तीन महिन्यांपासून अर्धवट असलेल्या कामाला गती देण्याबाबत आणि काम पूर्ण करण्याबाबत येथील नागरिकांनी ठेकेदार व अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क केला आहे. मात्र त्याची ना ठेकेदार दखल घेतोय ना अधिकारी. त्यामुळे सदरचे काम अत्यंत कासवगतीने चालू आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे. पाऊस झाल्यास या रस्त्यावर पाण्याचे डबके साचणार असून दलदल तयार होईल. त्यातून आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु सांगाव तर ऐकल जात नाही. कोणी अधिकारी पहायला तयार नाही. कर्मचारी काम करत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे जे हाल होताहेत ते होतच आहेत अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे ठेकेदाराची मनमानी सुरू असून नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पानसरे गल्ली रस्त्याबरोबरच इतर अर्धवट अवस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नव्हे तर आदेशच बांधकाम विभाग व ठेकेदारांना काढावेत अन्यथा अशा कामचुकार अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवार्ई करावी, अशी मागणी होत आहे.