घनकचरा करात दुप्पट वाढ करून मनपाचा व्यवसायिकांवर मोठा ‘घाव’

0
58

 

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या करनिर्धारण विभागाने वर्षासाठी २०२४-२५ घरपट्टीमध्ये अनिवासी वापरासाठी (दुकानदारांसाठी) घनकचरा करात दुपटीने वाढ करुन व्यावसायिकांवर मोठा घाव घातला आहे. दुकानदार यापुर्वी दरवर्षी वार्षिक १२०० रुपये घनकचरा कर भरत होते. तरीही नियमानुसार प्रत्येक दुकानात जावून कचरा उचलला जात नाही. बर्‍याच परिसरामध्ये घंटागाडीमध्ये बर्‍याच वेळा ड्रायव्हर एकटाच असतो किंवा सोबतचा जोडीदार जरी असला तरी तो खाली उचलून कचरा उचलत नाही. व्यावसायिकाला प्रत्येक वेळी स्वतः कचरा गाडीजवळ जाऊन कचरा टाकावा लागतो. तसेच कित्येक वेळा रस्ताही झाडला जात नाही. एकतर घंटागाडी एक दिवसाआड किंवा कधी कधी तर २-३ दिवसांनी येते. तसेच कित्तेक परिसरात दुकान उघडायच्या अगोदरच घंटागाडी येऊन गेलेली असते.

घंटागाडी नियमित येत नसताना करात वाढ करण्याचा निर्णय का? 

अशा तक्रारी कित्येक वर्षापासून नगरकर जास्तच सहनशील असल्याने सहन करत आहेत. या सहनशीलतेचा व आवाज न उठवण्याचा फायदा अहमदनगर महापालिका घेऊ पाहत आहे. जर घंटागाडी एक दिवसाआड येत असेल किंवा कधी कधी २-३ दिवस येत नसेल तर घनकचरा करात वाढ करण्याचा संबंधच येत नाही. पुर्वीचे प्रश्न न मिटवता कर वाढवण्याची घाई महापालिकेने न करता घंटागाडीच्या ठेकेदाराला व घंटागाडीवाल्या लोकांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्यावे. कित्येक परिसरात कचर्‍याची मोठी समस्या असतांना तो सोडविण्याऐवजी महागाई वाढवण्याची घाई महापालिका करु पहात आहे. तरी ही करवाढ त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी ललित भळगट यांनी केली आहे.