पिकअप चोरून नेणार्‍या दोघांना २४ तासात पोलिसांनी पकडले

0
23

नगर – घरासमोर उभा केलेला पिकअप चोरून नेणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीची पिकअप व दुचाकी असा २ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संदीप आप्पासाहेब बर्फे व राहुल नवनाथ बर्डे (दोघे रा. आडगाव, ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. खोसपुरी (ता. नगर) येथील रज्जाक सिकंदर शेख यांची पिकअप (क्र.एम एच १६ ए ई २४१४) त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करत असताना त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती काढली असता तो पिकअप जोडमोहज (ता. पाथर्डी) येथे असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या पथकाने पिकअप व त्याची चोरी करणार्‍या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पिकअप चोरीसह आडगाव येथून दुचाकी (क्र.एम एच १६, सी एल ७४०५) चोरी गेल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी पिकअप, दुचाकी हस्तगत करून दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, किशोर जाधव, सुनील आव्हाड, विष्णु भागवत, भगवान वंजारी, केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.