अरणगावच्या श्रीकृष्ण मंदिरात ११०० दाम्पत्यांसह श्री पंचावतार महापूजा कार्यक्रम

0
21

नगर – नगर तालुयातील अरणगाव येथे श्रीकृष्ण मंदिरात ११०० दाम्पत्यांसह कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्री पंचावतार महापूजा सोहळा, तसेच दीक्षा विधी करण्यात आले. राज्यासह सुरत, गुजरात येथील दाम्पत्य या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यानिमित्त महंत आचार्य बाभूळगावकर बाबा शास्त्री (करमाड) यांनी संगीत श्रीमद् भागवत कथेचे श्रवण केले, तसेच पोथी प्रवाचक महंत आचार्य न्यायबाबा शास्त्री (मकर धोकडा) यांनी पोथीचे प्रवचन केले. यावेळी संत-महंतांचे विविध विषयांवर प्रवचन झाले. अरणगावमधून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचे गावकर्‍यांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले.

प्रास्ताविकात चक्रपाणी महानुभाव आश्रमाचे अरणगावचे संचालक आचार्य निमगावकर बाबा उपाख्य राजेंद्र मुनी विराट यांनी सांगितले की, एवढा मोठा सोहळा हा महानुभाव वासीयांचा विजय आहे. ही एक अग्रपूजा आहे. आचार्य प्रवर कैवल्यवासी ज्ञानभास्कर वैराग्य महंत आंबेडगाव निवासी मोठे बाबाजी वर्षातून एकदा आश्रमात यायचे. त्यांच्याच आशीर्वादाने आज मंदिराचे काम पूर्ण झाले असून, हा सोहळा आपण पाहू शकतो. साधू-संतांच्या प्रेरणेने कलशारोहणाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडत आहे. जे कार्य आपण करतो त्याला लोक नाव ठेवतात. परंतु जो निः स्वार्थ भावनेने काम करतो, त्याच्या पाठीशी देव सदैव उभा असतो, असे ते म्हणाले. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य विध्वांस बाबा, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य माहूरकर बाबा, आचार्य जालनापूरकर बाबा, आचार्य न्यासबास बाबा, आचार्य बाळापूरकर बाबा, आचार्य भीष्माचार्य बाबा, आचार्य वायदेशकर बाबा यांच्यासह संत-महंत उपस्थित होते.

महंत राहेकर बाबा यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड. बाबासाहेब रणसिंग, इंजि. चंद्रशेखर जगताप, भगवान अनारसे, देवा धोंडे, पुरुषोत्तम भोसले, पंचकृष्ण उत्सव सेवा समिती व सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य मंदिर कळशारोहण सेवा समिती सदस्य व अरणगावव ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.