तरूणाच्या गळ्यातील सोन्याची चेन दोघांनी हिसका मारून पळविली

0
25

कल्याण रोडवरील घटना; चोरट्यांचा नगरमध्ये धुमाकूळ सुरूच

नगर – पाळीव कुत्र्याला घेऊन फिरवण्यासाठी मोकळ्या जागेत गेलेल्या तरूणाच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन दोघांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना कल्याण रोड परिसरात रविवारी दि.१९) सायंकाळी घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.२०) दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्वप्निल मोहन वाघ (वय ३५, रा. वसुंधरा पार्क, विद्या टॉवरच्या पाठीमागे, कल्याण रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. ते रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमी प्रमाणे पाळीव कुत्रा फिरवण्यासाठी घेऊन घराच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात गेले होते. त्यांच्या गळ्यात अडीच तोळ्याची सोन्याची चेन होती. त्याच वेळी २० ते २५ वयोगटातील दोन युवक त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने ओळख नसतानाही खांद्यावर हात ठेऊन ‘तु येथे काय करत आहे’ असे विचारले. त्यावर स्वप्निल ‘तुम्हाला काय करायचे’ असे म्हणाले असता दुसर्याने स्वप्निलच्या गळ्यातील चेन हिसका देऊन ओढली. त्यांना खाली ढकलून दिल्याने दुखापत झाली आहे. ते दोघे चेन घेऊन पळाले व काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवरून पसार झाले. स्वप्निल यांनी झालेला प्रकार घरच्यांना सांगितला व दुसर्‍या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अनोळखी चोरट्यांवर भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.