अंतराळवीर मलमूत्र विसर्जन कसं करतात?
अंतराळवीर अन्नपचन कसे करतात? या प्रश्नाऐवजी खरे तर, ते मलमूत्र विसर्जन कसे करतात, हा अधिक कुतूहलाचा विषय आहे. कारण अंतराळातल्या क्षीण गुरूत्वाकर्षणबलाची अडचण या शारिरीक क्रियेमध्येच जास्त येते. जमिनीवर असताना आपण मलमूत्र विसर्जनाचे काम ज्या प्रकारे करतो त्यात गुरूत्वाकर्षणाच्या बलाचा जास्त वापर केला जातो; पण अंतराळात ते काम त्या प्रकारे होणे शय नसल्याने दुसरीच काहीतरी व्यवस्था करावी लागते. तशी करताना घन पदार्थ आणि द्रवपदार्थ यांच्यामध्ये फरक केला गेला आहे. द्रवपदार्थांची म्हणजेच मूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी एका नळीचा वापर करण्यात येतो. त्या नळीमधून हवा ओढली जाते, त्यामुळे जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीतून मग मूत्र पुढं जात राहते. आणि नळीच्या शेवटी असलेल्या बंद पात्रात ते जमा होतं. पुरूषांसाठी या नळीच्या तोंडाशी एक नरसाळे बसवलेले असते, तर स्त्रियांसाठी एक कप असतो. ज्यांना श्वासोच्छ्वास करणे कठीण जाते अशांना सिलिंडरमधला ऑसिजन पुरवण्यासाठी नाकावर जसा कप बसवतात. त्याच प्रकारचा हा कप असतो. ते नरसाळे काय किंवा कप काय, शरीराला चिकटून बसवला की आपोआप एक सीलबंद प्रणाली तयार होते व त्यातून मूत्र खालच्या बंद पात्रात गोळा होते. मलविसर्जनासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. एक तर कमोडवर अंतराळवीर बसूही शकत नाहीत, कारण ते तरंगतच राहतात. त्या अवस्थेत मल तिथल्या तिथंच पसरून तरंगत इकडेतिकडे जाऊ शकते. एकंदरीत स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसे होणे घातकच आहे. त्यासाठी अंतराळवीरांना मोटारीत असतो तसा सीटबेल्ट दिला जातो. तो बांधला की मग ते कमोडशी जखडून राहतात. त्या कमोडमधूनही हवेचा वेगवान झोत खालच्या दिशेने सोडला जातो. जसे मूत्र त्या नळीमधून हवेच्या प्रवाहाबरोबर खेचले जाते. तसाच तो मलपदार्थ हवेच्या झोताबरोबर खालच्या दिशेने खेचला जातो. तो सर्व परत एका पात्रात गोळा होतो. तिथे त्याचा अंतराळातल्या निर्वात अवस्थेशी संपर्क येतो. त्यामुळे त्यातले बाष्प, त्यातली ओल विरून जाते. फ्रीजड्राय केल्यासारखे ते अतिशीत अवस्थेत ते कोरडे बनते. त्या अवस्थेतल्या मलाने ते पात्र भरले की ते मग घर्षणाने उत्पन्न होणार्या उष्णतेत पेट घेते. आणि जळून जाते. वातावरणात शिरलेल्या उल्काही अशाच जळून जाते. त्या पाहून आपण तारा तुटला असे म्हणतो; पण पुढच्या वेळी तुम्ही असा तुटलेला तारा बघाल तेव्हा कदाचित उल्केऐवजी ते अंतराळवीरांना टिकून दिलेले एक मलपात्रही असू शकेल.