निवृत्त संचालकांची मनमानी व हुकूमशाही थांबवून सभासदांना ठेवीवरील व्याज द्यावे

0
27

माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने

नगर – निवृत्त संचालकांची मनमानी व हुकूमशाही थांबवून ठेवीदार सभासदांना ठेवीवरील व्याज मिळण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक व सभासदांनी शुक्रवारी (दि.१७ मे) माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर निदर्शने केली. विविध मागण्यासाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात विरोधी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सभासद वैभव सांगळे, बाळासाहेब निवडुंगे, तौसीफ शेख, राहुल झावरे, बाळासाहेब मुळे, प्रसाद साठे, सतीश इंगळे, प्रसाद सामलेटी, रवींद्र गावडे आदी सहभागी झाले होते. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे आर्थिक वर्ष पूर्ण होऊन दोन महिने उलटले असताना देखील ठेवीदार सभासदांना कायम ठेवीवरील व्याज अद्यापी मिळालेले नाही. आर्थिक वर्ष पूर्ण होऊनही संस्थेचे ऑडिट झालेले नाही. दरवर्षी ऑडिटरला ८५ लाख रुपये देऊनही ऑडिट पूर्ण होत नाही, यामागचे गौडबंगाल काय आहे? इतर संस्थांनी मार्च महिना संपल्यावर कायम ठेववरील व्याज सभासदांना दिले आहे. सध्या जनरल मीटिंगची तारीख न ठरल्यामुळे जिल्हाभरातील सभासदांचा असंतोष पसरला आहे. सर्वसाधारण सभा घेण्यासाठी विलंब कशासाठी? हा प्रश्न सत्ताधारी संचालक मंडळाला विचारण्यात आला आहे. तर सोसायटीत चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच इतर संचालक काम करीत नसून, आर्थिक हितासाठी एक निवृत्त व्यक्ती संस्था चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये लाभांश १६ टक्के मिळावा, जामीन कर्ज मर्यादा २५ लाख करावी, कायम ठेवीवरील घसरत चाललेला व्याजदर वाढवावा व कर्जावरील व्याजदर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.