मलई पेढा
साहित्य : गाईचे दूध एक लिटर,
अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर, दोन मोठे
चमचे कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा वेलदोडापूड,
दोन चमचे बदाम-पिस्ते काप, सहा-सात
केशराच्या काड्या चुरून.
कृति : अर्धी वाटी दूध बाजूला काढून
उरलेलं दूध तापायला ठेवावं आणि आटवून
निम्मे करावे. दही चमच्याने फेटावे. फेटताना
त्यात बाजूला ठेवलेल्या दुधातले दोन चमचे
दूध घालावे. आटवलेल्या दुधात साखर घालून
गॅस जरा मोठा करावा. उकळी आली की
फेटलेल्या दह्याची धार त्यात धरावी व मंद
आचेवर ढवळत राहावे.
दूध फाटले की कॉर्नफ्लोअर व उरलेले
गार दूध एकत्र करून त्यात ओतावे. सतत
ढवळावे. पुन्हा गॅस मोठा करावा. मिश्रण
घट्ट होऊन खव्यासारखे दिसायला लागले
की उतरवावे. त्यात वेलदोडापूड मिसळावी.
गार झाल्यावर हव्या तेवढ्या आकाराचे पेढे
वळावेत व त्यावर चुरलेले केशर, बदाम-पिस्ते
काप लावून सजवावे. बिस्कीटकटरे हवा तो
आकारही देता येतो.