नगर जिल्ह्यात दुपारपर्यंत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान; अनेक केंद्रावर मतदारांनी लावल्या रांगा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

0
30

नगर – लोकसभा निवडणुकीसाठी नगर व शिर्डी मतदार संघातील ३ हजार ७३४ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरु होती. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली होती. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रावर किती लोक रांगेत उभे आहेत आणि त्यांना मतदान करण्याकरिता किती वेळ लागेल ही माहिती नागरिकांना एका बटणावर त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा लाभ अनेकांनी घेतला.

मतदान केंद्रावर वेबकास्टींग कॅमेर्‍याद्वारे करडी नजर भारत निवडणूक आयोगाने एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर मतदारसंघातील १ हजार १८ मतदान केंद्रांवर तर शिर्डी मतदार संघातील एकूण ८५६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग कॅमेरे लावण्यात आले होते. याशिवाय पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच शाळेत किंवा इमारतीत असणार्‍या नगर मतदारसंघातील १७२ मतदान केंद्रांवर व शिर्डी मतदार संघातील १३४ मतदान केंद्रांवरही वेबकॅमेरे लावण्यात आले होते. मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व गोपनीयतेचा भंग न होता मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे हे याद्वारे सुनिश्चित केले जाते. तसेच मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करणे व घडल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यासाठी देखील याचा वापर करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कळविले आहे.