उंदीर-मांजराचे युद्ध

0
39

उंदीर-मांजराचे युद्ध

एके ठिकाणी उंदीर आणि मांजरात तुंबळ युद्ध सुरु होते. गेेले कित्येक दिवस रणकंदन चालले होते. या युद्धात प्रत्येक वेळी उंदरांचा पराभव होत होता. उंदरांचे अनेक खंदे योद्धे लढाईत वीरमरण पत्करीत होते. होता-होता अनेक योद्धे शहीद झाल्याने उंदरांचे सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा याचा विचार करण्यासाठी उंदरांनी एक बैठक भरविली. युद्धात आपलाच पराभव सारखा का होत आहे, यावर विचार करता असे दिसून आले की, आपला सेनापती कोण, हेच उंदरांना न समजल्याने लढताना त्यांचा गोंधळ उडतो. तेव्हा चर्चेअंती असे ठरले की, जे सेनापती आहेत, त्यांनी आपल्या डोयावर गवताची मोळी बांधावी, म्हणजे इतर उंदरांना ते ओळखू येतील. अशा प्रकारे डोयावर गवताची मोळी बांधून सेनापती व इतर उंदीर लढाईत उतरले. पुन्हा घनघोर लढाईला तोंड फुटले. उंदरा-मांजरात जोराची जुंपली. मांजरांची सेना उंदीर सेनेवर तुटून पडली. अखेर पुन्हा उंदरांचा पराभव झालाच. पराभव होताच उंदीरसेना सैरावैरा पळत आपापल्या बिळात लपून बसली. मांजरांनी त्यांचा पाठलाग केला. पण सेनापतींनी आपल्या डोयांवर गवताची मोळी बांधली असल्याने त्यांना लवकर बिळात शिरता न आल्याने पाठलागावरील मांजरांनी त्यांना गाठले आणि झडप घालून त्यांना खाऊन टाकले.

तात्पर्य : मोठेपणा प्राप्त झाला, तर कर्तव्ये आणि जबाबदारीही वाढते.