खोटी बातमी प्रसिद्ध केल्याने ऑनलाईन न्यूज पोर्टलवर गुन्हा दाखल

0
37

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या अर्ज माघारी बाबत खोटी बातमी प्रसिद्ध केल्याने नगर मधील एका ऑनलाईन न्यूज पोर्टलवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक अरविंद बारसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत मुदत होती. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आय लव्ह नगर या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी खोटी माहिती या बातमीत प्रसिद्ध करण्यात आल्याचे बारसे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आय लव्ह नगर या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या व्यवस्थापकावर भा.दं.वि.कलम १७७ ग प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.