घर कसे असावे?

0
28

घर कसे असावे?

तुम्ही म्हणाल, राहणार्‍याला आवडेल असे असावे. कोणी म्हणेल सुंदर असावे, कोणी म्हणेल मजबूत असावे; पण चांगले घर कसे असते याचे काही निकष असतात. घरामुळे ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण होते; ही तर मूलभूत बाब आहे. घरात स्वयंपाक करणे, जेवणे, धुणे व मलमूत्र विसर्जन करणे इत्यादीसाठी सोयी असायला हव्यात. सांसर्गिक रोगांचा प्रसार कमी होईल, अशा प्रकारे घर बांधण्यात यावे. आगीसारख्या आपत्तींपासून रक्षण होण्याची सोय असावी. असे असल्यासच त्या घराला आरोग्यदायी घर असे म्हणता येईल. अशा घरात दोन व्यक्तींना राहायला कमीत कमी ११० चौरस फूट जागा असावी. तीन खोल्यांत ५ लोक, तर पाच खोल्यांत १० लोक राहू शकतील. घराभोवती मोकळी जागा असावी, घरात फरशा वा टाइल्स असाव्या, भिंती मजबूत असाव्या, छत निदान १० फूट उंचीवर असावे, दर व्यक्तीला कमीत कमी ५०० घनफूट इतकी जागा असावी. प्रत्येक खोलीला दोन खिडया असाव्यात. त्या जमिनीपासून तीन फुटाच्या वर नसाव्या. खिडकीचा भाग चटई क्षेत्राच्या १/५ इतका तर दार व खिडया मिळून २/५ इतका असावा. प्रत्येक घराला मलमूत्र विसर्जनासाठी संडास व न्हाणीघराची सोय असावी. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा. घर आरोग्यपूर्ण असेल तर क्षयरोग, इन्फ्ल्यूएझा, गोवर, घटसर्प, खरूज, कुष्ठरोग, प्लेग इत्यादी रोगांचा प्रसार होत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य नीट राहते. आजच्या काळात घर कसे असावे, हे पैसे किती आहेत यावर अवलंबून असते. ही गोष्ट जरी खरी असली, तरी आहे त्या पैशांत आरोग्याच्या दृष्टीने सुयोग्य असे घर बांधण्याचा प्रयत्न करावा.