एस.टी. बस प्रवासादरम्यान चोरीच्या घटना थांबता थांबेनात

0
49

आठवडाभरात पुन्हा एका महिलेचे सव्वा लाखांचे दागिने गेले चोरीला

नगर – एस.टी. बस प्रवासा दरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले असताना आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. पाथर्डी हून नगर मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी एस टी बस मध्ये बसलेल्या महिलेचे पर्स मध्ये ठेवलेले सुमारे १ लाख २६ हजार ७८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अश्विनी दादासाहेब सुपेकर (रा. भालगाव, ता. पाथर्डी) यांनी मंगळवारी (दि.७) सायंकाळी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुपेकर या पाथर्डी हून नगर मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी रविवारी (दि.५) सकाळी १०.३० च्या सुमारास पाथर्डी बस स्थानकात आल्या होत्या. त्या पाथर्डी नगर पुणे या बस मध्ये बसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जवळील मोठ्या पर्स मध्ये एका छोटी पर्स ठेवली होती. त्यात सुमारे १ लाख २६ हजार ७८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. बस प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स मधील दागिने ठेवलेली छोटी पर्स चोरली. पुण्या मध्ये गेल्यावर ही चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा पाथर्डी मध्ये जावून पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

८ दिवसांत तिसरी चोरीची घटना दरम्यान आठवडा भरापूर्वी २ मे रोजी नगरहून शेवगाव कडे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकातून एस टी बस मध्ये बसलेल्या केडगाव मधील महिलेचे पर्स मध्ये ठेवलेले सुमारे ४ लाख ४ हजार रुपये किमतीचे ५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत स्मिता कल्याण पागिरे (रा. रेणुका नगर, केडगाव, मूळ रा. आंतरवाली, ता. शेवगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.३) दुपारी माळीवाडा बस स्थानकावर एका सेवानिवृत्त शिक्षकाचा खिसा मारताना एका चोरट्या महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. प्रवासात महिलांनी दागिने सांभाळण्याची गरज सध्या लग्न सराई सुरु असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी महिला वर्ग एस टी बसला जास्त पसंती देत आहे. बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत शासनाने लागू केलेली असल्याने महिलांची नेहमीच एस टी बस प्रवासासाठी गर्दी होताना दिसत आहे. याच गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारे चोरटे सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रीय झालेले आहेत. शहरासह जिल्ह्यात बस स्थानकावर तसेच बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चोरट्यांनी पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हानच उभे केलेले आहे. त्यामुळे बस प्रवासात महिलांनी दागिने सांभाळण्याची गरज आहे.