ट्रॅक्टर उलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0
44

राहुरी – ट्रॅटरच्या सहाय्याने शेतात रोटाव्हेटर मारत असताना ट्रॅटर उलटून शेतकरी ट्रॅटरखाली दबून जागेवर ठार झाला. ही घटना राहुरी तालुयातील दरडगाव थडी येथे सोमवारी (दि.६) सकाळी घडली. संजय सीताराम जाधव (वय ४३) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. मयत जाधव यांची दरडगावथडी येथे मुळा नदीकाठी शेतजमीन आहे. ते सकाळी १०.३०वाजे दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅटरच्या सहाय्याने रोटा मारीत होते. यावेळी ट्रॅटरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅटर उलटला आणि संजय जाधव हा शेतकरी ट्रॅटर खाली दबला गेला. तेव्हा परिसरातील मच्छिंद्र जाधव, बाबुराव दोंदे, बापूसाहेब रोकडे, संदीप जाधव, मधुकर जाधव यांच्यासह अनेक तरुणांनी तात्काळ मदतकार्य करून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅटर उचलला आणि संजय जाधव या शेतकर्याला बाहेर काढले.

 

जाधव यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांना तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. संजय जाधव यांचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दुपारी उशिरापर्यंत संजय जाधव यांचे शवविच्छेदन सुरू होते. संजय जाधव यांच्या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.