नगर-पुणे महामार्गावर घाटात कारचालकाला अडवून ११ लाख ६५ हजारांचा ऐवज लुटला

0
77

नगर – नगर-पुणे महामार्गावर सुप्या जवळ असलेल्या पवार वाडी घाटात कारचालकाला मोटारसायकल आडवी लावून अज्ञात तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत, मारहाण करत सुमारे ११ लाख ६५ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत श्रीधर दत्तात्रय वर्धे (वय, ५७ वर्षे रा. शाकुंतला अपार्टमेंट, सदाशिव पेठ, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन सूपा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे दि.५ मे रोजी त्यांच्या मित्रासोबत कामाच्या निमित्ताने आले होते. ते सोमवारी पहाटे पुन्हा घरी पुण्याच्या दिशेने जात असतांना ३ वाजेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पवार वाडी घाटात काळ्या विनानंबरच्या पल्सर मोटार सायकलवरून अज्ञात तीन जणांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावर दुचाकी आडवी लावून अनोळखी तीन जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील २० हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी, ८० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये एक कॅरेट वजनाचा हिरा असलेली ६ ग्रॅम वजनाची अंगठी, ५० हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ५० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हातातील कडे, ५ लाख रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये पुष्कराज खडा असलेली २० ग्रॅम वजनाची अंगठी, ९० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये हिरा असलेली १० ग्रॅम वजनाची अंगठी, २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली साखळी, ९० हजार रुपये किंमतीची पांढर्‍या सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली अंगठी. तसेच खिशातील पाकीट त्यामध्ये एस.बी.आय.चे क्रेडेट कार्ड, डेबीट कार्ड, विश्वेश्वर बँक २ डेबीट कार्ड, एसेस बँकेचे डेबीट कार्ड, शरद सहकारी बँकेचे डेबीट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, इसकॉन लाईफ मेंबरशिप कार्ड, ३५ हजार रुपयांच्या चलनी नोटा असा एकूण ११ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लटून नेला. घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर झालेला प्रकार पोलीसांसमोर कथन केला. नंतर सुपा पोलिसांनी अज्ञात ३ जणांविरोधात भा.दं. वि.कलम ३९४, शस्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.