मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
21

गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात?

गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही; हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात! चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतया तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हटर्झ एवढ्या वारंवारतेचा आवाजच तो ऐकू शकतो. गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते. याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो; तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील बोळ्यांसारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.