थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो?
थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो? उन्हाळ्यात का नाही? कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायबरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो.
त्यामुळेच उष्णता वाढली की घाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते. कुडकुडणे म्हणजे स्नायूच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून उर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो!