साप खाल्ला तर माणूस मरतो का?

0
44

साप खाल्ला तर माणूस मरतो का?

काय घाबरलात ना? पण घाबरू नका! काही वर्षांनी का होईना, भारतातही हॉटेलात शिरल्यावर मेनूकार्डात चिकन, मटणाच्या बरोबर सापाचे मांस, कबाब इत्यादी पदार्थ नक्कीच लिहिलेले आढळतील. आजही चिनी उपाहारगृहात सापाचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. हळूहळू धान्याचा तुटवडा निर्माण होणारच आहे. त्यामुळे मनुष्य साप, उंदीर, बेडूक अशा अनेक प्राण्यांना फस्त करत सुटेल. अर्थात सध्याही जगाच्या काही भागात हे प्राणी खाल्ले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप हा भयंकर विषारी असतो; मग तो खाल्ल्यास मृत्यू येणार नाही का? साप खाल्ल्यावर माणूस मरत नाही, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सापाचे विष फक्त त्याच्या दातांजवळील ग्रंथीतच असते. ते सर्व शरीरभर पसरलेले नसते. त्यामुळे साप खाल्ला तरी कोणी मरणार नाही. दुसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकारचे प्रथिनच असते. जठरातील आम्ल व इतर विकारांमुळे या प्रथिनांचे पचन होऊन जाईल. कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. साप चावल्यानंतर एकतर हे विष रक्तातून शरीरभर पसरते किंवा स्नायूतून चेतातंतूमध्ये व तेथून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे सर्पविषबाधेची लक्षणे ही प्रामुख्याने रक्ताभिसरण संस्था किंवा मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतात. या दोन्ही कारणामुळे आपल्या लक्षात येईल की, साप खाल्ला तरी माणूस मरत नाही.