नगर – आचार्यश्रींची पवीत्र भूमी असलेल्या नगरला आल्यावर घरी, घरच्या लोकांमध्ये आल्याचा आनंद मिळतो. नगरकर भाविक असून साधूसाध्वींची सेवा करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. आताच्या काळात प्रभू भक्तीसाठी नितांत श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो. श्रद्धा आणि भक्ती जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी ताकद देते. यासाठी जीवनातील नकारात्मक गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. इतरांचे दोष शोधण्यात वेळ घालू नये. आपल्या मनात साचलेला त्रासदायक कचरा हटवला पाहिजे असे मौलिक विचार उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म.सा. यांनी मांडले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे सुशिष्य तथा अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर श्री प्रविणऋषीजी म.सा. यांचे गुरूवारी सकाळी आनंदधामच्या पवित्र प्रांगणात आगमन झाले. यावेळी झालेल्या प्रवचनात त्यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी सकाळी यश पॅलेस चौकात प्रविणऋषीजी म.सा. यांचे स्वागत करण्यात आले. आनंदतीर्थ परिवार, श्रावक श्राविका, हातात जैन ध्वज घेतलेले मुले स्वागतावेळी उपस्थित होते. प्रविणऋषीजी म.सा. बर्याच कालावधीनंतर नगरला आल्याने भाविकांमध्ये अपूर्व उत्साह पहायला मिळाला. आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत प्रविणऋषीजी म.सा. यांचे प्रवचन झाले. याप्रसंगी आलोकऋषीजी म.सा., तीर्थेशऋषीजी म.सा. डॉ. प्रियदर्शनाजी म.सा. आदी साधूसाध्वीजींसह आ. संग्राम जगताप, माजी आमदार निलेश लंके, आयोजक नरेंद्र फिरोदिया, सुनील मुनोत, गुरू आनंद फौंडेशनचे ट्रस्टी सी.ए. अशोक पितळे, अशोक बोरा, आनंदराम मुनोत, आदेश चंगेडीया, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, शिवसेनेचे संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.आनंदधामच्या प्रवेशद्वारावरील युवक युवतींनी सुंदर लोटस नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
स्वागत करताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आचार्य श्रींचे समाधीस्थळ ऊर्जा स्त्रोत आहे. त्याच पद्धतीने प्रविणऋषीजी महाराज यांचे मार्गदर्शन नगरकरांसाठी ऊर्जा देणारे ठरणार आहे. त्यांच्या सान्निध्याचा तीन दिवस नगरकरांना लाभ मिळणार आहे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांचे अनमोल विचार सर्वांसाठी लाखमोलाचे ठरणार आहेत. आ. संग्राम जगताप म्हणाले, प्रविणऋषीजी महाराज यांचे आगमन हा नगरकरांसाठी पवित्र पावन दिवस आहे. सर्वत्र प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने प्रत्येकाच्या जीवनात नवी पहाट उगवेल यात शंका नाही. प्रविणऋषीजी महाराज यांचा नगरमध्ये चातुर्मास व्हावा अशी सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. सी.ए. अशोक पितळे यांनी प्रविणऋषीजी महाराज यांच्या संकल्पनेतून चिचोंडी येथे साकारत असलेल्या आनंदतीर्थाची माहिती दिली. यावेळी प्रविणऋषीजी महाराज यांनी अर्हम विज्जा अंगिकारत मोठा बदल घडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. १३ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाला अर्हम विज्जा ट्रेनर बनण्याची संधी असून नांव नोंदणी खुली केली आहे. स्विडन येथील स्विडीश परिवारातील दोन मुले या ट्रेनरसाठी उत्सुक असून जुन्नर येथील मुस्लिम परिवाराचे सदस्यांनीही नोंदणी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शेवटी मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना कटारिया यांनी केले.