मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अहमदनगर अॅडव्हर्टायझर असोसिएशनचा पुढाकार
नगर- लोकसभा निवडणुकीनिमित्त भारतात सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक प्रौढ नागरिकांस मतदार यादीत नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आहे. मतदान हा केवळ मूलभूत हक्क नसून कर्तव्य आहे. दुर्दैवाने आपल्याकडे मतदानाविषयी उदासीनता दिसून येते. याचसाठी मतदान जागृती होण्यासाठी अहमदनगर अॅडव्हर्टायझर असोसिएशनने ’मतदान माझा हक्क आणि तो मी बजावणारच’ या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष नितीन देशमुख व फेमचे उपाध्यक्ष अभि मुथा यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतः चे मतदान करताना आपल्या संपर्कातील प्रत्येकाला यासाठी प्रेरित करायचे आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरी आपले मतदान लवकर करून नंतर सुटीचा आनंद लुटला पाहिजे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. त्यामुळे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर जाणे अपेक्षित आहे. निबंध ५०० ते ७०० शब्द मर्यादेत सुवाच्य अक्षरात लिहून द्यावा. स्वतःचे संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक देण्यात यावा. निबंधात भारतीय लोकशाही, मतदानाचा हक्क, चांगले लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्याची आवश्यकता अशा विविध बाबींचा उहापोह अपेक्षित आहे. प्रथम क्रमांकाच्या तीन निबंधासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ५ मे पर्यंत खाली नमूद पत्त्यावर निबंध पोहोच करायचे आहेत. अभि पब्लिसिटी, स्वामी विवेकानंद पुतळ्यामागे, शनी चौक, अहमदनगर.